केवळ होर्डिंग लावून प्लॅस्टिक बंदीचा दिखावा! शहरात खुलेआम होतोय प्लॅस्टिक पिशवीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:11 IST2025-02-16T12:10:15+5:302025-02-16T12:11:47+5:30

Chandrapur : नगरपालिकेकडून कारवाईच होत नसल्याचा आरोप

Plastic ban is being shown by just putting up hoardings! Plastic bags are being used openly in the city | केवळ होर्डिंग लावून प्लॅस्टिक बंदीचा दिखावा! शहरात खुलेआम होतोय प्लॅस्टिक पिशवीचा वापर

Plastic ban is being shown by just putting up hoardings! Plastic bags are being used openly in the city

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती :
शहरात बंदी असलेल्या ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक व प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शहरात खुलेआम वापर सुरू आहे. बाजारपेठेत विक्रेते या प्लॅस्टिक पिशवीचा वापर करताना दिसत आहे. मात्र यावर नगरपालिकेने कोणतीही कारवाईची मोहीम राबवली नाही. केवळ न.प.ने प्लॅस्टिकबंदीचे होर्डिंग लावूनच दिखावा केल्याचे दिसून येत आहे.


शहरातील बुधवारी आठवडी बाजारात फळविक्रेते, भाजीविक्रेते, चिकन-मटन विक्रेता, खाद्यपदार्थांसह इतर दुकानात बंदी असणाऱ्या प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. या प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांमार्फत घरोघरी गेल्याने या प्लॅस्टिक कचऱ्याचे ढिगारे होताना दिसत आहे. कचऱ्याचे प्रदूषण वाढले आहे.


मात्र या प्रकाराकडे नगरपरिषदेचे पूर्णता दुर्लक्ष असल्याने या विक्रेत्यांवर नगरपालिकेचा अंकुश आता राहिलेला नाही. परिणामी व्यावसायिकांना प्लॅस्टिक वापराबाबत कोणतीही भीती राहिलेली नाही. कारवाई होतच नाही, असा त्यांचा समज झालेला दिसून येत आहे. त्यामुळे दररोज या प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याने भद्रावतीकरांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.


स्वच्छ सर्वेक्षण अभियान गेले कुठे?
नगरपरिषद भद्रावतीमार्फत माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठे होर्डिंग लागले आहे. त्यामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी ७५ मायक्रोनपेक्षा कमी प्लॅस्टिक व प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी असल्याचे तसेच उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक केल्यास पाच हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई अशा सूचना होर्डिंगवर करण्यात आल्या आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून शहरात या प्लॅस्टिकचा खुला वापर केला जात आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियान गेले कुठे, असा प्रश्न पडतो. नगरपालिका यावर कोणतीही कारवाई न करता केवळ होर्डिंगच्या माध्यमातून प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणाऱ्यावर अंकुश आणेल काय हा भद्रावतीकरांसाठी चिंतनाचा विषय आहे.


५ हजार रुपये दंडाची होते प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई
प्लास्टिक पिशव्यांचे निर्मुलन होत नाही. त्यामुळे पर्यावरणावर याचा परिणाम होतो. याशिवाय हे प्लास्टिक वापर झाल्यानंतर कुठेही फेकले जातात. कधी त्यात खाद्यपदार्थही असते. त्यामुळे ते जनावरांच्या पोटात जातात.


"दिवसेंदिवस शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लॅस्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे याचा पर्यावरणावर तसेच मानवी जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी."
- डॉ. किशोर शिंदे, भद्रावती

Web Title: Plastic ban is being shown by just putting up hoardings! Plastic bags are being used openly in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.