स्वच्छतेनंतर आता प्लॉस्टिकमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:31 PM2018-02-26T23:31:18+5:302018-02-26T23:31:18+5:30
चंद्रपूर महानगरपालिका मागील काही महिन्यांपासून स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. यामुळे शहराचे स्वरुप पालटले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका मागील काही महिन्यांपासून स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. यामुळे शहराचे स्वरुप पालटले आहे. स्वच्छता दिसू लागली आहे. आता शहर प्लॉस्टीकमुक्त करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यासाठी विशेष पथक तयार केले असून सोमवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे.
प्लॉस्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या या प्लॉस्टिक पिशवी जप्ती मोहिमेत पाच किलो प्लॉस्टिक पिशव्या व खर्रा पन्नी जप्त केली असून सुमारे सहा हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर महापालिकेने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. रस्ते, चौक, उकिरडे स्वच्छ दिसू लागले आहेत. घाणीने बरबटलेले डास उत्पत्ती केंद्र असलेले बायपास मार्गावरील डम्पींग यार्ड आता उद्यानासारखे दिसू लागले आहे. मात्र ‘स्वच्छ व सुंदर चंद्रपूर’ मध्ये शहरात वाढलेला प्लॉस्टिकचा वापर अडथळा ठरत आहे. त्यामुळे आता मनपाने प्लॉस्टिकमुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लॉस्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेवाल्यांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना पन्नी बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने खर्रा पन्नीचा वापर करणाºया पानठेल्यांवर तसेच प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करणारी छोटे मोठे दुकाने, चायनीज स्टॉल, पान ठेले, फळ विक्रेता, उपहारगृह, टी स्टॉल विरोधात जोरात कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेच्या तीन झोनमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर सोमवारी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पाच किलो प्लॉस्टिक पिशव्या जप्त करून विक्रेत्यांकडून सहा ६५० रुपये दंड आकारण्यात आला आहे. या मोहिमेवर आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त शितल वाकडे, सचीन पाटील, धनंजय सरनाईक लक्ष ठेवून आहेत.
कापडी पिशव्या हाच पर्याय
शहरातून प्लॉस्टिकचे निर्मूलन करण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या या मोहिमेत सहभागी होऊन कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा, दुकानदारांवर अवलंबून न राहता घरातून कापडी पिशवी नेऊन सामान खरेदी करावे, दुकानदारांनी प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करू नये. नागरिकांनी पानठेलेवाल्यांकडून पन्नीमध्ये खर्रा विकत घेऊ नये व शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे, अशी विनंती मनपाकडून करण्यात आली आहे.
मनाई असतानाही वापर
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिक पिशव्या वापरास मनाई आहे. तरीही अनेक दुकानदार प्लॉस्टिक पिशव्य्यांचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. वास्तविक हा न्यायालयाचाच अवमान आहे. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध दुकान व्यावसायिकांनी, पानठेलाधारकांनी प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर टाळणे आवश्यक आहे.