डम्पींगमधील प्लास्टिकही हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:11 PM2018-07-02T23:11:11+5:302018-07-02T23:11:51+5:30
सध्या देश प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत मनपाने चंद्रपूर शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या देश प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत मनपाने चंद्रपूर शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच शहरातील डम्पींग यार्डमध्ये लाखो टन प्लास्टिक पडून असल्याने त्यापासूनही पुढे चंद्रपूरकरांना धोका होऊ नये, यासाठी आता डम्पींग यार्डही प्लास्टिकमुक्त केले जाणार आहे. येथील प्लास्टिक आता अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने जाळण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी मनपाकडून जनजागृती केली जात आहे. प्रसंगी प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईदेखील केली जात आहे. असे असले तरी अद्याप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. येथील डम्पींग यार्डमध्ये वर्षानुवर्षापासूनचे लाखो टन प्लास्टिक पडून आहे. या प्लास्टिकमुळे प्रदूषण वाढून चंद्रपूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जनावरांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे आता मनपाने डम्पींग यार्डमधील या अविघटनशिल कचºयाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेने अंबुजा सिमेंट लिमिटेडसोबत वेगवेगळ्या कोरड्या घनकचºयाची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी करार केला आहे. सदर कचरा अंबुजा सिमेंट कारखान्यात नेल्यावर १४०० डिग्री सेंटीग्रेड तापमानावर तो जाळण्यात येईल. शास्त्रोक्त पद्धतीने जाळल्याने हवामानावर त्याचा काही परिणाम होणार नाही. सिमेंट कारखान्याच्या भट्टीसाठी या इंधनाचा वापर करण्यात येतो, ज्याला रिफ्युज डिराईव्हड फ्युयल, असे म्हणतात. अंबुजा सिमेंट कारखान्याची भट्टी महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाच्या मानकाप्रमाणे प्रमाणित आहे. भविष्यात पर्यावरणपूरक हवामानाच्या दृष्टीने महानगरपालिका गतीने पाऊले उचलत आहे.
प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेन्ट २०१६ च्या नियमांतर्गत प्लास्टिक किंवा थर्माकोल अशा अविघटनशील वस्तूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी मनपातर्फे डम्पींग यार्डवर जमा झालेल्या अविघटनशील कचºयाला अंबुजा सिमेंट कारखान्याला पाठविण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
आज सोमवारी येथून प्लास्टिक घेऊन निघालेल्या पहिल्या वाहनाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. महानगरपालिकेतर्फे अंदाजे दोन टन प्लास्टिक पहिल्या फेरीत पाठविण्यात आला. याप्रसंगी सहायक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शितल वाकडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी ( स्वच्छता ) नितीन कापसे, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी तसेच अंबुजा सिमेंटचे डॉ. मिश्रा व सुभाष ढवळे उपस्थित होते.
प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी धाडसत्र व्यापक हवे
शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर पहिल्याच दिवशी चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील शंभर किलो प्लास्टिक जप्त करून व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्लास्टिकमुक्त शहरासाठी व्यापक नव्हती. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबविण्यात आले नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर अजूनही शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मनपाजवळ मनुष्यबळ नाही, असे सांगितले जाते. मात्र खरेच प्लास्टिकमुक्त चंद्रपूर करायचे असेल तर मनपाने जादा कर्मचाऱ्यांचा ताफा या कामी लावणे आवश्यक आहे.
या कचऱ्याचे होणार विघटन
थर्माकोल, चप्पल, सॅन्डल, बूट, प्लास्टिक, चिंधी, कापड, रेग्झिन, टायरचे तुकडे, चामड्याचा कचरा, मल्टीलेअर प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्स यासारखा अविघटनशील कचरा हा फक्त उच्च तापमानावरच जास्त वेळ ठेवल्याने विघटित होतो. भारतामध्ये, जिओसायकल ही कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडच्या सिमेंट भट्टीमध्ये सह-प्रक्रियेद्वारे टिकाऊ कचरा व्यवस्थापनाची सुविधा पुरवते. सहप्रसंस्करण तंत्रज्ञानाद्वारे कचºयाचे व्यवस्थापन एक सुरक्षित आणि पर्यावरणदृष्टया प्राधान्यकृत पर्याय म्हणून ओळखले जाते.