बल्लारपूरचे क्रीडांगण विदर्भात अद्यावत ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:18 PM2018-01-29T23:18:41+5:302018-01-29T23:19:39+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारक साकारणारे शिल्पकार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम केले जाणार आहे.

The playground of Ballarpur will be updated in Vidarbha | बल्लारपूरचे क्रीडांगण विदर्भात अद्यावत ठरणार

बल्लारपूरचे क्रीडांगण विदर्भात अद्यावत ठरणार

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : २७ कोटींच्या क्रीडा संकुलाच्या बांधकामाला प्रारंभ

आॅनलाईन लोकमत
विसापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारक साकारणारे शिल्पकार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या भागातील क्रीडापटूंना द्रोणाचार्याशिवाय यश संपादन करण्याची संधी क्रीडांगणाच्या माध्यमातून मिळणार आहे. यामुळे बल्लारपूरचे क्रीडांगण विदर्भात नावलौकिक मिळवणार असून अद्यावत ठरणार, असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केला.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वीज कंपनीच्या वसाहतीलगत १५ एकर जागेत क्रीडा संकूल बांधकामाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना श्यामकुळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, विसापूर येथील सरपंच रिता जिलटे, रेणुका दुधे, नागपूर क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, तहसीलदार विलास अहीर, राणी द्विवेदी आदींची उपस्थिती होती.
ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, या क्रीडा संकुलाचा उपयोग जवळच होऊ घातलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. याला लागून वनस्पती उद्यान पूर्णत्वास जात आहे. सर्वांना शिक्षण, रोजगार, आरोग्य व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आपला प्रयत्न राहणार आहे. बल्लारपूर शहरातील नागरिकांना पंतप्रधान घरकूल योजनेतून घरे मिळावी, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये यश येण्याची खात्री आहे. योगगुरु रामदेवबाबा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित मूल येथे शेतकरी मेळावा घेणार असल्याचे सांगून बल्लारपूर शहराला स्मार्ट करून भारताच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. यावेळी हरीश शर्मा यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता डी. के. बालपांडे यांनी केले, तर संचालन लोचन वानखेडे यांनी केले.
नावलौकिक मिळविणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार
बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल २७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. या बांधकामाचा शुभारंभ करताना बल्लारपूर शहराचा नावलौकिक वाढविणाऱ्या क्रीडापटूंच्या हस्ते मंत्रोपचारात भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सुनील मांझी, आलोक पाल, संजय पारधी, रूखसार बानो, रमेश नातरंगी, कशीश कोडापे, अनुप पोतलवार, ललिता मिसार, मनोज झाडे, विनोद शहा यांचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व क्रीडा पोशाख प्रदान करून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या मिळणार सुविधा
बल्लारपूर तालुक्यात विसापूर हद्दीत साकारणाऱ्या तालुका क्रीडा संकुलात दोन लॉन टेनिसकोर्ट, दोन कबड्डी मैदान, खो-खो क्रीडांगण, बॉस्केट बॉल, व्हॉलीबॉल, जलतरण तलाव, धनुर्विद्या केंद्र व ४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी तयार करण्यात येत आहे. सभोवताल संरक्षण भिंत, सुरक्षा खोली व प्रवेशद्वार, बॅडमिंटन हॉल, पॅव्हेलियन कक्ष, ५० मुलांच्या क्षमतेचे अद्यावत वसतिगृह, पोशाख बदलण्यासाठी खोली बांधकाम १५ एकर जागेच्या परिसरात केले जाणार आहे.

Web Title: The playground of Ballarpur will be updated in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.