आमचे आता आधी पूनर्वसन करा हो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : आतापर्यंत या भागातील सर्वात मोठा पूर आम्ही या डोळ्याने अनुभवला आहे. आता पुन्हा असा तांडव आम्हाला पहायचा नाही, वारंवार उद्ध्वस्त होणे आता असह्य झाले आहे. सुखरूप जीवन जगता येईल, यासाठी आमचे आधी पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडू, अशी मागणी लाडज ग्रामवासीयांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आहे. स्थानिक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पूरपीडितांनी आपल्या व्यथांची श्रृंखलाच यावेळी व्यक्त केली.
दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती. परंतु राष्ट्रीय आपत्कालीन व राज्य आपत्कालीन पथकांच्या जवानांनी आम्हाला जीवनदान दिले आहे. पुन्हा आम्हाला असे दिवस पाहण्याची वेळ येऊ नये, यासाठी आमचे पहिले पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडणार, अशी इशारावजा विनंती लाडजवासीयांनी केली आहे. घरे गेली, पीक गेले. आता आमच्या जवळ काहीही शिल्लक राहिले नाही. परंतु आम्ही सुरक्षित आहोत, हे आमच्या साठी मोठे आहे. गावात चार ते पाच फूट गाळ आहे. १७०० लोकवस्तीच्या गावात गायी म्हशी साठी १० ते १२ लोक आहेत. बाकी सर्वच ब्रम्हपुरीत आले आहेत. आता गावात जाण्याची हिंमत होत नाही, त्यासाठी आमचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. नाही तर आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही, असा टाहो जमलेल्या ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणून केला. बेलगाव (जाणी) येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी राहण्यासाठी आधी आम्हाला घरकूल द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त पूरग्रस्त गावाना आर्थिक मदत, घरकूल व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी मोफत धान्य व अनुदान देण्याची मागणी अन्य ग्रामस्थांनी केली आहे.
लाडजच्या संपूर्ण गाववासीयांची एकच मागणी आहे की आमचे पुनर्वसन करा. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही.
-अमोल रामकृष्ण मोहुर्ले,
गावकरी, लाडज