प्रवासी निवाऱ्यांअभावी नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:31+5:302021-07-28T04:29:31+5:30
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री चंद्रपूर : शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे ...
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
चंद्रपूर : शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात अन्न निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अपुऱ्या अधिकाऱ्यांमुळे खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करताना तारांबळ उडत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अवैध पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
चंद्रपूर : आझाद बागेजवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स ते हिंदी सिटी हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर अवैधरीत्या चारचाकी वाहने पार्क केली जातात. ही वाहने दिवसभर तिथेच राहत असल्याने या रस्त्यावर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर व्यावसायिक गाळे असल्याने ग्राहक मोठ्या संख्यने येतात. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जड वाहतूक बंद करावी
चंद्रपूर : गंजवाॅर्डामध्ये भाजी, तसेच धान्य बाजार आहे. गंजवॉर्डामध्ये सरदार पटेल कॉलेज, खासगी दवाखाने, बँकासुद्धा आहेत. त्यामुळे याठिकाणी बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन येथील जडवाहतूक बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
योजनांची माहिती नागरिकांना द्या
चंद्रपूर : शासनाकडून सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहेत. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतेअभावी नाल्या तुंबल्या
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या पडोली परिसरातील अनेक नाल्यांची स्वच्छता झाली नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी अडले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
योजनांची अंमलबजावणी करावी
चंद्रपूर : आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात; परंतु तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्या योजना पोहोचल्या नाहीत. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
बेरोजगारांची अडवणूक थांबवावी
चंद्रपूर : युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय व पारंपरिक व्यवसायांसाठी कर्ज देण्याचा नियम आहे; पण राष्ट्रीयीकृत बँकांकडून अडवणूक केल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे.
बीएसएनएल सेवा बनली डोकेदुखी
चंद्रपूर : भारतीय दूरसंचार विभागाकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या ढिसाळ सेवेमुळे परिसरातील शेकडो ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाइल व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होते. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढल्याचा आरोप होत आहे.
रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी
चंद्रपूर : काही गावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बांधकाम विभागाला निधी न मिळाल्याने काही कामे रखडली. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.
प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी चंद्रपुरातील जनतेने केली आहे.
घंटागाडी नियमित फिरवा
चंद्रपूर : चंद्रपूर परिसरातील हरिओमनगर येथे घंटागाडी नियमित येत नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडचण होत आहे.
उद्योगात स्थानिक युवकांना प्राधान्य द्या
चंद्रपूर : कोरपना तालुक्यात उद्योग आहेत; परंतु स्थानिक बेरोजगार युवकांना संधी मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. युवकांमध्ये निराशा पसरत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी युवकांनी केली आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
पडोली परिसरातील नाल्या तुंबल्या
चंद्रपूर : पडोली परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही नागरिक कचरा पेटीऐवजी रस्त्यावर टाकतात. त्यामुळे कचरा पेट्यांची संख्या वाढवावी, सूचना फलक लावावेत, तसेच गावात नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.