खासगी कंत्राटदाराकडून प्लॉटधारकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:25 PM2018-11-09T22:25:56+5:302018-11-09T22:26:22+5:30
येथून जवळच असलेल्या देवाळा येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने प्लॉटधारकांना विविध आमिष दाखवून ड्युप्लेक्सची विक्री केली. मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधितच घराच्या टाईल्स कोसळत असल्याने प्लॉटधारकांना धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या देवाळा येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने प्लॉटधारकांना विविध आमिष दाखवून ड्युप्लेक्सची विक्री केली. मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधितच घराच्या टाईल्स कोसळत असल्याने प्लॉटधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व देवाळा येथील सरपंचाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपूरलगत असलेल्या देवाडा येथील सर्व्हे क्रमांक १३०/३ येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने सन २०१२ साली प्लॉटची विक्री केली. यावेळी अनेकांनी डयुप्लेक्सची खरेदी केली. यावेळी कंत्राटदार राजेश पोलेवार व अलोक घाटे यांनी परिसरात आकर्षक पथदिवे, २४ तास सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा, डांबर रोड बनवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र कोणत्याही सुविधा करुन दिल्या नाही. तर या ड्युप्लेक्समधील तेलंग यांच्या घरातील टाईल्स आपोआपच जमिनीवर कोसळल्या. याबाबत त्यांनी कंत्राटराकडे तक्रार केली असता, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच सुविधाही उपलब्ध करुन देल्या नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची फसवणूक झाली असल्याने चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
वॅटच्याऐवजी लावले जीएसटी
‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीतर्फे तयार करण्यात आलेले ड्युप्लेक्सचा करार सन २०१२ मध्ये आहे. यावेळी करारामध्ये वॅट लावणे गरजेचे होते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर कंत्राटदाराने जीएसटी लाऊन अतिरिक्त रक्कम प्लॉटधारकांकडून वसूल केली आहे. त्यामुळे प्लॉटधारकांची लूट झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांची चौकशी करुन कार्यवाही करावी व मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.