शहरात भूखंडांच्या किमती गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:11+5:302021-08-01T04:26:11+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड शहरात भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढत चाललेल्या या किमतीमुळे भूखंड खरेदी करून त्यावर ...
घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीड शहरात भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढत चाललेल्या या किमतीमुळे भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधणे हे सामान्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे.
नागभीड हे शहर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना मध्यवर्ती आहे. असे असले तरी, पाच-सहा वर्षांपूर्वी नागभीडमधील भूखंडांना तेवढी मागणी नव्हती. मागणी नसल्यामुळे भूखंडांना तेवढे दरही नव्हते. दहा-बारा वर्षांपूर्वी नागभीड भोवतीच्या वसाहतींमध्ये प्रती चौरस फूट ६० ते ७० रुपये अशा दराने भूखंड मिळत होते.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नागभीडमध्ये आता अनेक वसाहती निर्माण होत आहेत. नागभीड इतर जिल्ह्यांना मध्यवर्ती आणि रेल्वेचे जंक्शन. त्यातच आता नागभीड - नागपूर या रेल्वे लाईनचे रूपांतर ब्राॅडगेजमध्ये होत असल्याने नागभीडला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. एकंदरीत प्रवासाच्या दृष्टीने नागभीड हे अतिशय सोयीचे शहर ठरत आहे. यामुळेही भविष्यकाळातील तरतूद म्हणून नागभीड येथे भूखंड खरेदी करून ठेवण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. याचाही परिणाम भूखंडांच्या किंमती वाढण्यामागे होत आहे.
बॉक्स
अशा झाल्या नव्या वसाहती
शहरात पहिली वसाहत पंचायत समिती परिसरात निर्माण झाली. त्यानंतर मुसाभाईनगर ही वसाहत अस्तित्वात आली. हळूहळू येथे अनेक वसाहती निर्माण झाल्या. आता तर अनेक वसाहती निर्माणाधिन आहेत. संपूर्ण नागभीडच्या भोवतीच वसाहती निर्माण होत आहेत, असे सद्यस्थितीत दिसून येत आहे. आदर्श काॅलनीचा मागील भाग, राममंदिरच्या बाजूचा भाग, फ्रेंड्स काॅलनीचा मागील भाग, दूध शीतकरण केंद्राजवळील भाग, तुकूम रोड, बोथली रस्ता, नागपूर रोड या ठिकाणी निर्माणाधिन असलेल्या वसाहतींवरून हेच दिसून येत आहे. या वसाहतींमध्ये भूखंडांची किंमत प्रती चौरस फूट ८०० ते १,००० रुपये दराने सुरू आहे. दर्शनी भागात तर यापेक्षाही जास्त दर असल्याची माहिती आहे.