४० हजारांत पाच लाखांच्या नकली नोटा विकण्याचा डाव; राजुरा येथे दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 01:24 PM2023-01-16T13:24:41+5:302023-01-16T13:28:37+5:30

एलसीबीची कारवाई, तीन दिवसांचा पीसीआर

Plot to sell fake notes of 5 lakhs for 40 thousand, two held in rajura | ४० हजारांत पाच लाखांच्या नकली नोटा विकण्याचा डाव; राजुरा येथे दोघांना अटक

४० हजारांत पाच लाखांच्या नकली नोटा विकण्याचा डाव; राजुरा येथे दोघांना अटक

googlenewsNext

चंद्रपूर : ४० हजार रुपयांत ५ लाखांच्या नकली नोटांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यासंदर्भात पाचशे रुपयांच्या नकली नोटासह यवतमाळ जिल्ह्यातील हनुमान भोजेकर (२४) व सैफुद्दीन जलाउद्दीन सय्यद (२२) दोघेही रा. वणी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपासामध्ये आरोपी नकली नोटांची विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात निखिल भोजेकर नावाचा व्यक्ती हा अनेक दिवसांपासून कमी किमतीत नकली नोटांचा पुरवठा करत होता. तो चंद्रपूर जिल्ह्यात नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा ते आसिफाबाद मार्गावरील रेल्वे लाइनजवळ सापळा रचला. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व पथकाने मारुती आर्टिगा वाहनाला थांबविले. त्यानंतर वाहनांची झडती घेण्यात आली. वाहनांमध्ये पोलिसांना ५०० रुपये नोटांचे बंडल आढळले. या बंडलमध्ये नकली नोटा ओळखू येऊ नये यासाठी मागे-पुढे चलनातील नोटा लावण्यात आल्या होत्या. या नकली नोटांवर चिल्डरन्स बँक असे छापले होते.

नकली नोटसहित एकूण १० लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपी निखिल हनुमान भोजेकर (२४) व सैफुद्दीन जलाउद्दीन सय्यद (२२) दोघेही रा. वणी जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर ४२० व ३४ कलमअंतर्गत राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, रवींद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहुले, प्रमोद डंभारे यांनी केली. आरोपीला तीन दिवसांचा पीसीआर मिळाला असून तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला आहे.

तेलंगणातील इसमाने दिली पोलिसांना माहिती

जिल्ह्यात नकली नोटा विकण्यासाठी दोघे जण येत असल्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला तेलंगणातील कुमराभीम (आसिफाबाद) जिल्ह्यातील रवींद्रनगर येथील एका इसमाने माहिती दिली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

नोटा घेताना बाळगा सावधानी

व्यवहार करताना अनेकवेळा ग्राहक तसेच व्यावसायिक नोटांकडे बारकाईने बघत नाही. मात्र एखाद्यावेळी नकली नोटा हातात आल्यानंतर मोठी फजिती होते. त्यामुळे व्यवहार करताना प्रथम नोटांची तपासणी करा, नकली नोटा आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. म्हणजे, आपली फसवणूक होणार नाही.

Web Title: Plot to sell fake notes of 5 lakhs for 40 thousand, two held in rajura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.