पीएम केअर फंडाचे ३५ व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन फ्लो करण्यात कमजोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:12+5:302021-05-14T04:27:12+5:30

चंद्रपूर : गतवर्षी देशभरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून पीएम केअर फंडातून देशभरातील रुग्णालयांना ...

PM Care Fund's 35 ventilators weak in oxygen flow | पीएम केअर फंडाचे ३५ व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन फ्लो करण्यात कमजोर

पीएम केअर फंडाचे ३५ व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन फ्लो करण्यात कमजोर

Next

चंद्रपूर : गतवर्षी देशभरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून पीएम केअर फंडातून देशभरातील रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स पुरविले होते. चंद्रपूर जिल्ह्यालाही ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. मात्र, हे व्हेंटिलेटर्स रुग्णांना पूर्ण क्षमतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यात कमजोर ठरले आहेत. व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसाठी रुग्णालयात कायमस्वरूपी तंत्रज्ञही नाहीत. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी पीएम फंडाचे व्हेंटिलेटर्स निरुपयोगी ठरत असल्याच्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या तक्रारी आहेत.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच केंद्र सरकारकडून पीएम केअर्स फंडातून व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले होते. गेल्यावर्षी जिल्ह्याला ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्यातील १० व्हेंटिलेटर्स महिला रुग्णालयात, तर २५ व्हेंटिलेटर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले. काही दिवस व्यवस्थित चालल्यानंतर त्यामध्ये आता अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मेन्टेनन्स करूनच हे व्हेंटिलेटर्स रुग्णांसाठी वापरले जात आहेत. मात्र, त्यामध्ये वारंवार अडचणी येत आहेत. व्हेंटिलेटर्समधून ऑक्सिजन फ्लो होत नाही आणि प्रेशर होण्यातही बाधा निर्माण होते, असा रुग्णांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८४ व्हेंटिलेटर्स आहेत. कोविड रुग्णवाढीच्या तुलनेत व्हेंटिलेटर्सची संख्या कमी आहे.

उपचारादरम्यान बंद पडत असल्याने तारांबळ

जिल्ह्याला ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. सर्वच व्हेंटिंलेटर्सचा सध्या वापर सुरू असल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मात्र, हे व्हेंटिलेटर्स उपचारादरम्यान अचानक बंद पडतात. उपस्थित डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. काही व्हेंटिलेटर्स तर उपयोगाविना धूळ खात पडून आहेत, असा आरोपही रुग्णांच्या कुटुंबीयांनी केला.

कोविडसाठी ८४ व्हेेंटिलेटर बेड्स

विविध योजनेतून राज्य सरकारनेही चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला काही व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले. हे व्हेंटिलेटर्स कोविड काळात रुग्णांसाठी जीवनदायी ठरले. जिल्ह्यातील कोविड सर्व रुग्णालयात सद्यस्थितीत ८४ व्हेेंटिलेटर्स व १९७ आयसीयु बेड्स उपलब्ध आहेत. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे बेड्स कमी पडले आहेत.

कोट

पीएम फंडातून मिळालेल्या ३५ व्हेंटिलेटर्सची स्थिती चांगली नाही. परंतु, दुरुस्ती करून ते रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. काही व्हेंटिलेटर्स विदेशी बनावटीचे असल्याने दुरुस्तीसाठी वारंवार तंत्रज्ञ बोलाविण्याचा खर्च पेलण्यासारखा नाही. पण, आरोग्य आणीबाणीची गरज म्हणून तातडीने मेंटेनन्स मेंटेन करणे व रुग्णांना उपलब्ध करून देणे सुरू आहे.

- डॉ. अविनाश टेकाडे, प्र. अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर

Web Title: PM Care Fund's 35 ventilators weak in oxygen flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.