कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधानांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:23+5:302021-05-21T04:29:23+5:30
ग्रामीण व शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे आवाहन चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड १९ परिस्थितीबाबत ...
ग्रामीण व शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे आवाहन
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड १९ परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि राज्याने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा करून ग्रामीण भाग कोरोनामुक्त करण्यासाठी भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह राज्यातील अनेक जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. यात अहमदनगर जिल्ह्याधिकारी यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. यावेळी मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची माहिती दिली. वास्तविक वेळेत देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचा अनुभव त्यांनी सामायिक केला. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्र्यांनी प्रत्येकाला महामारीविरोधात लढा देण्यासाठी पूर्ण बांधिलकी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, कोरोना विषाणूने काम अधिक आव्हानात्मक केले आहे. या नवीन आव्हानांच्या दरम्यान, नवीन रणनीती आणि उपाय आवश्यक आहेत. गेल्या काही दिवसांत देशात सक्रिय रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली आहे; परंतु हा संसर्ग किरकोळ प्रमाणातही अस्तित्वात असेपर्यंत आव्हान कायम असल्याचे त्यांनी बजावले. महामारीविरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि सांगितले की, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचे अनुभव व अभिप्रायांची व्यावहारिक व प्रभावी धोरणे बनवण्यात मदत होते. रुग्णसंख्या कमी होत असली तरीही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे संदेश प्रसारित करण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामीण व शहरी भागासाठी विशिष्ट मार्गाने रणनीती आखून ग्रामीण भारत कोविडमुक्त करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली.
बॉक्स
जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती आहे. असे असले तरी तेथील स्थानिक प्रशासन, अनेक व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी थांबवायची आहे. त्यामुळे सर्वांच्या सहभाग आणि सहकार्याने आपल्याला पुढील काळात कोरोनाशी लढा देऊन यशस्वी व्हायचे आहे. तसेच मास्क, शारीरिक अंतर आणि स्वच्छता या बाबी लोकांच्या सवयीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.