पोंभुर्णा नगर पंचायत स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:44 PM2019-01-27T22:44:41+5:302019-01-27T22:45:04+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील पोंभुर्णा नगर पंचायत १७ जानेवारीला झालेल्या स्वच्छ डॉट सीटी वेबसाईटच्या गणनेत स्वच्छता अॅप क्रमवारीत भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. त्यामुळे पोंभुर्णा शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील पोंभुर्णा नगर पंचायत १७ जानेवारीला झालेल्या स्वच्छ डॉट सीटी वेबसाईटच्या गणनेत स्वच्छता अॅप क्रमवारीत भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. त्यामुळे पोंभुर्णा शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासीबहुल पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाने वेग घेतला असून नगरपंचायतीच्या स्थापने पासूनच या क्षेत्रात रस्ते विकास, पाणीपुरवठा या बाबींना अग्रक्रम देत त्यांनी शहरात विकासाचे विविध उपक्रम राबविले आहेत. पोंभुर्णा नगरपंचायतचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करुन नागरिकांना अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला. यावर नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांची नोंद केली. त्याची दखल घेत त्या समस्या व तक्रारी सोडविण्यात आल्या. याबाबतच नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांचे ४०० मार्कासाठी गुणदान करण्यात आले. त्यापैकी पोंभुर्णा नगरपंचायतीला २७४ गुण प्राप्त झाले.
त्यामुळे पोंभुर्णा नगरपंचायत अॅप वापरण्यामध्ये देशात पहिल्या क्रमाकांची ठरली आहे. यापूर्वी चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वेस्थानके देशातील सर्वात सुंदर व स्वच्छ रेल्वे स्थानके म्हणून पुरस्कृत ठरली आहेत. पोंभुर्णा नगरपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविल्याने वनमंत्री मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
इको-पार्क टाकतोय सौदर्यांत भर
भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी इको पार्क, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाची देखणी इमारत, नव्याने बांधकाम सुरु असलेली नगरपंचायतची इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासोबतच नव्या देखण्या बसस्थानकाचे नुकतेच भूमिपूजन झाले असून टूथपिक उत्पादन प्रकल्प, आयटीशीच्या साहाय्याने अगरबत्ती प्रकल्प, बांबू हॅडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट असे विविध रोजगाराभिमुक उपक्रम शहरात कार्यान्वित झाले आहेत.
मागील काही महिन्यांपासून नागरिकांना अॅप डाऊनलोड करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत असून १७ जानेवारीच्या गणनेत पोंभुर्णा नगरपंचायतीने ४०० पैकी २७४ गुण पटकावून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
-विपीन मुद्धा, मुख्याधिकारी, नगर पंचायत, पोंभुर्णा