दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलीस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:35 PM2019-03-16T22:35:59+5:302019-03-16T22:36:22+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दारू तस्करीविरोधात विशेष मोहीम राबवून दारू विक्रेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरु केलेले आहे. सहा दिवसात तब्बल सव्वा कोटींचा दारूसाठा जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दारू तस्करीविरोधात विशेष मोहीम राबवून दारू विक्रेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरु केलेले आहे. सहा दिवसात तब्बल सव्वा कोटींचा दारूसाठा जप्त केला आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू झाली. तरीही अवैध दारू विक्रीचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या अनेक मोहिमाद्वारे धाड टाकून दारू जप्ती तसेच गुन्हेगारांना अटकेचे सत्र सुरूच आहे. १० मार्चला आचारसंहिता सुरु झाल्यापासून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, याकरिता पोलीस विभागाने दारू तस्करी विरोधात कंबर कसली आहे. निवडणुकीच्या काळात दारूच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याची शक्यता लक्षात घेता या बाबतीत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिलेले आहेत. यासंदर्भात पोलीस दलासोबत त्यांनी नुकतीच बैठक घेतली. यामध्ये त्यांनी दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात या दारू विक्रीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यावर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने ९ मार्चपासून ते १५ मार्च अशा सहा दिवसातच १७६ गुन्हे नोंदवून दारू विक्रेत्यांना अटक करून त्यांच्यावर जबर वचक बसवला आहे. या धाडीतून तब्बल एक कोटी २३ लाख ४० हजार रुपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच दारू विक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कलम ८८ , कलम ६५ (अ) व (इ) आणि भांदवी कलम १८८ अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कायद्याच्या कलमानुसार आरोपींना रोख रक्कमेद्वारे दंड आणि तीन वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क असून आता अवैध दारू तस्करांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि दारू विकेत्यांना जबर हादरा बसला आहे.
पोलिसांच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निवडणूक काळात अधिकचे छापे टाकून दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या जाईल
-डॉ. महेश्वर रेड्डी,
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.