कोळसा चोरीत पोलीस व वेकोलि अधिकाऱ्यांचाच हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:15 PM2019-01-23T23:15:12+5:302019-01-23T23:15:42+5:30
कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा चोरी होत आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधून चोरीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात असताना अशाप्रकारची चोरी होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या चोरी दडण्यामागे वेकोलि व पोलीस प्रशासनाला शासनाचे पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. पैनगंगा कोळसा खाणीतून दररोज १० ट्रक कोळशाची चोरी होत आहे. ही चोरी नियमित होत असल्यामुळे सशस्त्र चोरीचे धाडस करण्यात आल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोतावार, माजी जिल्हाध्यक्ष शिवाराव, शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता अग्रवाल, माजी नगरसेवक राजेश अड्डूर, रशीद शेख आदी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे मोबदला जमा करा
वेकोलि प्रकल्पग्रस्तांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जात असल्यामुळे अनेकजण अद्यापही यापासून वंचित आहे. हा वाटप किती काळ चालेल, हे कळायला मार्ग नाही. शासनाने धनादेशाद्वारे प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यापेक्षा सदर रक्कम त्यांच्या खात्यात एकाचवेळी आरटीजीएसद्वारे जमा करावी, अशी मागणीही आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
घटनेने उडाली होती खळबळ
शनिवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास हायवा ट्रकसह ३० ते ४० जण वेकोलिच्या वणी क्षेत्रातील पैनगंगा कोळसा खाणीत सशस्त्र घुसले होते. मायनिंग सरदारच्या गळ्यावर तलवार ठेवून खाण लुटली होती.