पोलिसांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त

By admin | Published: April 3, 2015 12:59 AM2015-04-03T00:59:51+5:302015-04-03T00:59:51+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी निर्णयाची अंमलबाजवणी सुरू होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.

Police broke into the liquor barracks | पोलिसांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त

पोलिसांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त

Next

दारूमाफिया हादरले : सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी निर्णयाची अंमलबाजवणी सुरू होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. बुधवारी व गुरूवारी पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकून मोठा दारूसाठा जप्त केला. तर अनेक ठिकाणच्या धाडीत दारूअड्डे उद्ध्वस्त करून साहित्य जप्त केले. सीमावर्ती भागात नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असल्याने या कारवाईमुळे दारूमाफिया हादरले आहेत.
दारूबंदी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दारूबंदी होण्याच्या दोन ते तीन दिवसाअगोदरच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेऊन सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारवाई सुरू झाली असून बुधवारी बल्लारपूर पोलिसांनी विसापूर येथे एका घरात दारूसाठा जप्त केला होता. तर गुरूवारी ऊर्जानगर, मुंडीगेट, डोंगरगाव येथे धाडी टाकून मोठा दारूसाठा जप्त केला.
दुर्गापूर : दारूबंदीच्या आदेशाला झुगारुन अवैधपणे दारू विकणाऱ्या दुर्गापूर वॉर्ड क्र. तीन येथील आजी, मुलगी, नातू यांच्या घरुन तब्बल १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या ४७ पेट्या गुरूवारी पकडण्यात आल्या. सदर कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलिसांनी केली. यात गुन्हा दाखल करुन तिघांनाही अटक करण्यात आली आहे. दुर्गापूर वॉर्ड क्र. ३ येथील प्रख्यात अवैध दारू विक्रेती गंगुबाई राजम बुद्धार्थीवार (६०) ही महिला गत अनेक वर्षापासून येथे राजरोसपणे दारू विकत होती. दारूबंदीच्या आदेशाला झुंगारुन बिनधास्तपणे नेहमी प्रमाणे तिचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरु असताना, गुरुवारी सकाळी ८.३० वाजता दुर्गापूर पोलिसांना भनक लागली. लगेच पोलिसांनी गंगुबाईच्या घरी धाड टाकली. यात लगतच राहणारी तिची मुलगी राजश्री अंजय्या मंत्रीवार (३१) हिच्या घरी ७८० रुपये किंमतीचे १६ देशी दारूच्या निपा सापडल्या. तिला अटक करण्यात आली. मात्र दारू विक्री जोमात सुरुच होती. याची माहिती चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. लगेच मोठ्या पोलीस ताफ्यासह गंगुबाईच्या घरी पुन्हा धाड टाकण्यात आली. त्यात १ लाख ४८ हजार ८२९ रुपये किंमत असलेले देशी दारूच्या ५० पेट्या व विदेशी दारूच्या पाच अशा एकूण ५५ पेट्या दारू सापडल्या. तर नातू प्रशांत मामीडवार याच्याकडूनही दोन देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या. तिघांवरही गुन्हा दाखल करुन अटक केली.

चार हजाराच्या दारूसह नऊ ड्रम मोहफुलाचा सडवा जप्त
सुब्बई : विरुर पोलीस ठाण्यअंतर्गत येत असलेल्या मुंडीगेट येथे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व विरुर पोलीस ठाण्याच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ४ हजार ३५० रुपयाची मोहफुलाची दारू व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ताराबाई फुलासिंग जाधव या दारूविक्रेत्या महिलेस अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व विरुर पोलीस ठाण्यातर्फे मोहफुल व गुंडाबा दारू विक्रेत्याच्या अड्यावर धाड टाकली. या कारवाईत पाच लिटर दारू व नऊ ड्रम मोहफुलाचा सडवा आढळून आला. ही कारवाई विरुरचे ठाणेदार सुरेश भोयर, एम.एच. सरकटे, अरुण नवघरे, राठोड, सपना बेलदरवार, सुष्मा आडकीने व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने केली.

दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक
मूल : तालुक्यातील डोंगरगाव येथील अवैध दारु विक्री करणाऱ्या दोघांना मूल पोलिसांनी अटक केली. वच्छला लक्ष्मण सोनुले (५०) व मल्लेश यल्लेया भंडारी (४७) असे आरोपीचे नावे असून दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून देशी दारूचे १६ निपा जप्त करण्यात आले. मूल पोलिसांनी अवैध दारू करणाऱ्यांवर पायबंध घालण्यासाठी दोन पथक निर्माण केले असून एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कोणत्याही नागरिकाला अवैध दारूसाठा संदर्भात माहिती असल्यास पोलीस ठाण्याला कळवावे, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक जी. आर. विखे पाटील यांनी केले आहे.

पहिल्या दिवशी १४ दारूविक्रेत्यांना अटक
दारूबंदी अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी १४ दारूविक्रेत्यांना अटक केली. रामनगर, बल्लारपूर, घुग्घुस, दुर्गापूर, भद्रावती, वरोरा, नागभीड, मूल, सावली या तालुक्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड टाकून १ लाख १७ हजार २३० रूपये किमंतीची १ हजार ७१९ निपा दारू जप्त केली. तर दुसऱ्या दिवशीहो पोलिसांनी धाडी टाकल्या.

पोलिसांची नाकाबंदी
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत यवतमाळ जिल्हा असल्याने या जिल्ह्यातून दारू पुरवठा होऊ नये, यासाठी घुग्घुस पोलिसांनी वर्धा नदी, मुंगोली व बेलोरा पुलावर व नदीतील विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. संशयास्पद आढळणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेण्याचा सपाटाही पोलिसांनी सुरू केला आहे. घुग्घुस, नकोडा, बेलसणी गाव वर्धा नदीला लागून असल्याने यवतमाळ जिल्ह्यातून दारू येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशनुसार ठाणेदार मनिष ठाकरे यांनी या भागार पोलीस कर्मचारी तैनाती करून गस्त सुरू केली आहे.

पोलिसांच्या तुकड्या तैनात
ब्रह्मपुरी : दारूची आयात होऊ नये, यासाठी ब्रह्मपुरी तालुक्याच्या सीमेलगत पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ब्रह्मपुरी तालुका जिल्ह्याच्या पूर्व टोकावर आहे. तालुक्याला लागून गडचिरोली व भंडारा जिल्ह्याच्या सीमा आहेत. गडचिरोली जिल्ह्याला तालुक्यातून अवैध दारू पुरविली जात होती. हे अनेक कारवायातून दिसून आले. मात्र आता चंद्रपूर जिल्ह्यातच दारूबंदी झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारू कोणत्या मार्गने जाणार हे सांगता येत नसले तरी ब्रह्मपुरीच्या उत्तर व पूर्व टोकावर वैनगंगा नदीची किनार असून लाखांदूर व पवनी या दोन तालुक्याच्या भंडारा जिल्ह्यातील सीमा आहेत. या दोन्ही सीमावर्ती भागातून दारूची तस्करी होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने व स्थानिक पोलीस प्रशासनाने तोरगाव (मोठा), हरदोली व गांगलवाडी (टी पॉइंट) या प्रमुख मार्गावर पाच ते सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

वरोरा व राजुरा तालुक्यात नाकाबंदी
दारूचा पुरवठा रोखण्यासाठी वरोरा तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील खांबाडा येथे तर चंद्रपूर-यवतमाळ मार्गावरील सोईट येथे पोलिसांनी चौकी उभारून नाकाबंदी केली आहे. तर राजुरा तालुक्याती आंध्र प्रदेश सीमेला लागून असलेल्या अनुअंतरगाव, लक्कडकोड येथे पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. आरटीओ चेकपोस्टरवरही वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

Web Title: Police broke into the liquor barracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.