वेळगावातील पोलीस चौकी रामभरोसे

By admin | Published: January 14, 2016 01:49 AM2016-01-14T01:49:58+5:302016-01-14T01:49:58+5:30

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा येथील पुलाच्या निर्माणानंतर व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यामुळे लाठी पोलिसांनी केंद्रस्थानी असलेल्या वेळगावात पोलीस चौकी उभी केली.

Police chawki Ram Bharosi | वेळगावातील पोलीस चौकी रामभरोसे

वेळगावातील पोलीस चौकी रामभरोसे

Next

लाठी पोलिसांचे दुर्लक्ष : तस्करांना रान मोकळे तर प्रवाशांची अडवणूक
आक्सापूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा येथील पुलाच्या निर्माणानंतर व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यामुळे लाठी पोलिसांनी केंद्रस्थानी असलेल्या वेळगावात पोलीस चौकी उभी केली. चौकीवर पूर्णवेळ पोलिसांच्या नेमणुका करण्यात आल्या असून चौकीतील पोलिसांच्या बेजबाबदार आणि दुर्लक्षित कारभारामुळे ही चौकी केवळ देखावाच ठरली आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम वर्धा नदीवर करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर आंतरराज्यीय व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसुद्धा केल्याने गोंडपिपरी तालुक्यातील मद्यपीची वर्दळ तेलंगणा प्रदेशात सुरू झाली. हा प्रकार पाहता जिल्ह्यातील पोलीस विभागाने विधायक दृष्टिकोनातून सीमावर्ती भागातील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी तालुक्याच्या मार्गावरील मुख्य केंद्र असलेल्या वेळगावात अलिकडेच पोलीस चौकी उभारली. आंतरराज्यीय वाहतूक, तस्करी व व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी या चौकीचा उपयोग कुठल्याच प्रकारे उपयोग होताना दिसून येत नाही. धाबा व लाठी या रस्त्यावरुन बेकायदेशिर वाहतूक खुलेआम सुरू आहे. विनादिक्कतपणे तेलंगणातून दारू व सुगंधित तंबाखूची तस्करी चालली आहे. मात्र पोलीस चौकीतील लाठी पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. चौकीत आळीपाळीने पोलिसांची ड्युटी लागत असते. येथे पूर्णवेळ पोलिसांची नेमणूक करण्यात आली नसून येथील पोलीस केवळ बघ्याची भूमिका निभावत असल्याचा आरोप तालुक्यातील जनतेकडून होत आहे.
या मार्गावरुन मोठमोठ्या तस्करींचे प्रकार घडून येत आहेत. आजच्या स्थितीत महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली. तरीपण गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्ती गावात मोठ्या प्रमाणात तेलंगणा प्रदेशातील तंबाखू व दारू सहजतेने उपलब्ध होत आहे. या स्थितीत लाठी पोलिसांची वेळगावातील चौकी मात्र केवळ देखावा ठरली आहे. सदर चौकीतील पोलिसांकडून मार्गावरील प्रवासी जनतेची अडवणूक होत आहे. येथील पोलिसांनी मद्य प्राशन करुन असल्याच्या कारणावरुन कुठलीही शहानिशा न करता प्रवाशांना ताब्यात घेणे सुरु केले आहे. या प्रकारामुळे लाठी पोलिसांची प्रवासी व गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
अशातच दोन दिवसांपूर्वी मूल येथील काही युवक तेलंगणातील कागजनगर येथे ट्रॅक्टरचे साहित्य खरेदीकरिता गेले होते. त्या दिवशी रात्री ते परत आले. परतीच्या मार्गावर वेळगावात शेकोटीवर ते आग शेकत असताना चौकीतील पोलिसांनी युवकांना ताब्यात घेतले. पोलिसांजवळ युवकांनी सत्य कथन केले.
याशिवाय संबंधित युवक मद्य प्राशन करुन नसल्याने यावेळी ते बिनधास्त होते. तरीही पोलिसांनी वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला. शेवटी युवक पैसे देऊन मोकळे झाले. मात्र मूल येथील सदर युवकांच्या एका पत्रकार मित्राने पोलिसांचा हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Police chawki Ram Bharosi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.