पोलिसांनी बालाजी महाराजांचा रथ ओढून परंपरा जोपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:55 AM2021-02-28T04:55:21+5:302021-02-28T04:55:21+5:30
चिमूर : येथील बालाजी महाराज घोडा रथयात्रेतील रातघोड्याला फार महत्त्व आहे. या रात्री बालाजी महाराज आरूढ असलेला लाकडी रथ ...
चिमूर :
येथील बालाजी महाराज घोडा रथयात्रेतील रातघोड्याला फार महत्त्व आहे. या रात्री बालाजी महाराज आरूढ असलेला लाकडी रथ धार्मिक विधीनुसार बालाजीभक्त चिमूर शहराच्या मुख्य मार्गाने ओढतात. श्रींची परिक्रमा पूर्ण करतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या जमावबंदीमुळे देवस्थान कमिटी व प्रशासनाच्या आदेशाने मोजकेच बालाजीभक्त उपस्थित होते. त्यामुळे खाकी वर्दीतील पोलिसांनी बालाजी महाराजांच्या धार्मिक कार्यात सहभागी होऊन रथ ओढून नेण्याची परंपरा अखंडित ठेवली.
मोजक्याच बालाजीभक्तांच्या उपस्थितीत रात घोड्याची परिक्रमा काढण्यात आली.
हा रथ ओढण्यासाठी मंदिराचे, स्वयंसेवक, भक्त ओढून शहरातून परिक्रमा करतात. यावर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे कमी भाविकांनी हजेरी लावली होती. पोलीस प्रशासन शांतता व कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करीत धार्मिक कार्यात सहभागी झाले. दरवर्षी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना हा रथ ओढण्याची संधी मिळाली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, उपनिरीक्षक अनिस शेख, राजू गायकवाड यांनी हा रथ ओढून परंपरा अखंडित ठेवली. कोरोनाच्या नियमाचे पालन करीत बालाजी महाराजाची रात घोडा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी हातभार लावला.