पतीची हत्या होऊनही पोलिसांनी केले आत्महत्येत रुपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:53+5:30
पोलिसांनी मारहाण झाल्यानंतर दादारावने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी केवळ दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या पतीच्या मृतदेहावर गंभीर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. जिवती पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला तयार नाही, असाही आरोप सुजाता पतंगे या पीडित महिलेने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील मुकदमगुडा येथे आपला पती दादाराव नारायण पतंगे यांची गाव पाटलासह सहा जणांनी लाथाबुक्क्या, दगड व काठीने अमानुष मारहाण करून हत्या केली. त्यांच्याजवळ विषाची बाटली ठेवली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असताना जिवती पोलिसांनी केवळ आरोपींच्या बचावासाठी हत्येचा गुन्हा दाखल केला नाही, असा गंभीर आरोप मृतकाची पत्नी सुजाता पतंगे यांनी चंद्रपूर प्रेस क्लब येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
पोलिसांनी मारहाण झाल्यानंतर दादारावने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी केवळ दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या पतीच्या मृतदेहावर गंभीर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. जिवती पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला तयार नाही, असाही आरोप सुजाता पतंगे या पीडित महिलेने केला आहे.
पतीचा मुकदमगुडा येथील संतोष माधव पतंगे व सचिन माधव पतंगे यांच्यात दगड मारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावरून संतोष व सचिन यांनी तेलंगणातील केरामेरी पोलिसात तक्रार केली. केरामेरी पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे पतीला मारहाण करून सोडून दिले. ४ फेब्रुवारी रोजी पती दादाराव मुकदमगुडा येथे गेले असता संतोष पतंगे (गाव पाटील), लिंबाजी पतंगे (सरपंच, तेलंगणा), सचीन पतंगे, प्रयागबाई पतंगे, सूर्यकला संतोष पतंगे व अष्टशिला लिंबाजी पतंगे यांनी काठी, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत नालीत पाडून जिवानिशी मारले. ही घटना दिनेश नागोराव पतंगे व आकाश उमाजी वाठोरे यांनी प्रत्यक्ष बघितली. त्यांच्या डोक्यावर, मानेवर, दंडावर व गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या. तसेच कपडे फाटलेले व रक्ताने माखले होते. या घटनेची जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता कोणतीही शहानिशा न करता आपल्या पतीने विष घेऊन आत्महत्या केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आपले खोटे बयाण लिहून त्यावर अंगठा घेतला आहे, असा गंभीर आरोपही पीडित महिला सुजाता पतंगे यांनी यावेळी केला. या घटनेचा तपास जिवती पोलिसांकडून काढून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करण्याची मागणीही पीडिता सुजाता पतंगे यांनी यावेळी केली.
मृतदेहावर अग्निसंस्कार नाही
दादाराव पतंगे यांची हत्या झाली असतानाही जिवती पोलीस आरोपींचा बचाव करीत आहे. माझ्यासह माझ्या तीन चिमुकल्या मुलांना न्याय देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा तपास करावा, यासाठी पतीच्या मृतदेहावर अग्निसंस्कार न करता दफनविधी केला आहे, ही बाबही पीडिता सुजाता पतंगे यांनी यावेळी नमुद केली.