पोलीस मित्र संकल्पनेतील मैत्री हरविली
By admin | Published: July 12, 2015 01:11 AM2015-07-12T01:11:39+5:302015-07-12T01:11:39+5:30
जिल्ह्यात पोलिसांचा ताफा कमी आहे. धार्मिक सणांच्या बंदोबस्तात हा ताफा अपुरा पङत असतो.
रुपेश कोकावार बाबूपेठ (चंद्रपूर)
जिल्ह्यात पोलिसांचा ताफा कमी आहे. धार्मिक सणांच्या बंदोबस्तात हा ताफा अपुरा पङत असतो. तो भरुन काढण्यासाठी सध्या पोलीस मित्राचा वापर करुन घेतला जात आहे. आता लवकरच धार्मिक सणांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्या या जुन्या मित्राची आठवण झाली आहे. रविवारपासून प्रत्येक ठाण्यात पोलीस मित्रांसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. मात्र पोलिसांच्या ताफ्यात भर पडावी हाच पोलीस मित्र या संकल्पनेचा मुळ उद्देश नाही. सामाजातील प्रत्येक घटकाला पोलिसांशी जुळता यावे. पोलिसांचे काम जवळून पाहता यावे. पोलीस हा माझा मित्र आहे, ही भावना समाजात रुजून नागरिक आणि पोलीस यांच्यात मैत्रीचा सलोखा निर्माण व्हावा, हा खरंतर या संकल्पनेमागील उद्देश आहे. मात्र अलिकडच्या काळात पोलीस मित्र या संकल्पनेतील मैत्रीच हरविल्याचे दिसून येत आहे.
आताही पोलीस मित्र हा उपक्रम पोलीस विभागाकडून राबविण्यात येत आहे. या उपक्रमामधून इच्छुक मुलांनी पोलीस मित्रचा अर्ज भरुन पोलीस मित्र म्हणून नोंदणी करुन पोलिसांच्या कामात हातभार लावायचा आहे. यातून पोलिसांच्या कमी ताफ्यात भर पडणार आहे. मात्र संकल्पनेमागील मूळ उद्देश सफल होणार काय, हा प्रश्नच आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी अंगावर पोलीस मित्रांची टि शर्ट, डोक्यावर टोपी आणि गळ्यात पोलीस मित्राचे ओळख पत्र लावून एखाद्या रुग्णवाहिकेच्या समोर धावत गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट काढून देणाऱ्या तरुणांना सर्वानीच पाहिले असेल. मात्र गणेश विसर्जन अटोपताच तो तरुण कुठे हरवितो, याची कोणालाच माहिती नसते. विशेष म्हणजे, ज्या पोलीस खात्यासाठी निस्वार्थपणे मदत केली, त्या खात्याकडेही त्यांची फक्त कागदावरच माहिती असते. गणेश विसर्जन आटोपताच या साऱ्यांचाच विसर पोलीस खात्याला पडतो. आता हे पोलीस मित्र कुठे आहेत. ते त्याच पत्त्यावर राहतात का, याची महिती घेण्याची साधी तसदीही त्यांचे मित्र असलेल्या पोलिसांकडून घेतल्याचे आजवर दिसून आले नाही. कधी काळी एखाद्या कामाकरिता हा पोलीस मित्र ठाण्यात येतो, आपण पोलीस मित्र असल्याचे तो अभिमानाने सांगतो. मात्र पोलिसांकडूनच त्याची खिल्ली उडवलीे जाते. असा वाईट अनुभव अनेक पोलीस मित्रांना यापूर्वी आला आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. ही बाब पोलीस मित्रांसाठी आणी पर्यायाने पोलीसांना मदत करणाऱ्या सर्वांसाठीच दुर्देवी आहे.
पोलीस मित्र ही संकल्पना जुनी आहे. मात्र खऱ्या अर्थाने चंद्रपुरात ही संकल्पना हेमंत करकरे यांनी पोलीस अधीक्षक असताना सुरु केली. या मागचा उद्देश समाजातील सर्व घटकांना पोलिसांच्या जवळ आणण्याचा होता. त्यावेळी चांगल्या पोलीस मित्रांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जायचे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हस्ताक्षर असलेले प्रमाणपत्र दिले जायचे. तसेच वेळोवेळी त्यांना एकत्र करुन मार्गदर्शन केले जायचे. मात्र अलिकडे ही संकल्पना हरवली आहे. आता फक्त गणेश उत्सव जवळ आल्यावरच पोलिसांना या आपल्या मित्राची आठवण होत असते. आता काही महिन्यातच गणेशजींचे आगमण होणार आहे. आणि त्या प्राश्वभूमीवर पोलिसांना या आपल्या हरवलेल्या मित्राची आठवण झाली आहे.
यावेळी नवे घडण्याची आशा
महिला सहायक कक्षांमधे उपनिरीक्षक म्हणून काम पाहत असलेल्या वर्षा खरसान यांच्यावर यंदा पोलीस मित्र बनविणे, त्यांना कामे देणे, याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी ही वर्षा खरसान यांनी सामाजात जनजागृती करणारे अनेक कार्यक्र म यशस्वी पार पाडले आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यापूर्वी त्यांनी शाळा, माहाविद्यालयात जनजागृती करीत महिलांवर होणारे अत्याचार व ते होऊ नये, यासाठी घेतली जाणारी काळजी, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांचा हा उपक्रम चागलाच गाजला होता. त्यामुळे पोलीस मित्र ही संकल्पना त्या कशा राबवितात, याकडे लक्ष आहे.
पोलिसांसाठी काम करणाऱ्या पोलीस मित्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कटिबध्द आहो. यावेळी या पोलीस मित्रान्ाां एमपीएससी, तसेच इतर श्रेत्रातही त्यांना यशस्वी होता यावे, यासाठी स्पर्धा परीक्षेची त्यांची तयारी करून देण्याचाही आपला मानस आहे. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक शोधले जात आहे. सामाजिक कार्यात रुची असणाऱ्यांनी आपले नामांकन दाखल करुन घ्यावे. त्यांचा फक्त बदोबस्तासाठीच वापर न करता वेळोवेळी त्यांची मदत घेतली जाईल आणि शक्य ती मदत त्यांनाही दिली जाईल. पोलीस मित्र हा पोलीस सदस्यातीलच एक सदस्य आहे.
-वर्षा खरसान
पोलीस उपनिरीक्षक,
महिला सहायक कक्ष चंद्रपूर