दारू तस्करांच्या युक्त्यांपुढे पोलीस यंत्रणा हतबल

By admin | Published: July 14, 2015 01:29 AM2015-07-14T01:29:46+5:302015-07-14T01:29:46+5:30

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात अवैध दारूचे अक्षरश: पाट वाहत आहेत. जिल्ह्यात येणारी दारू

Police machinery in front of liquor smugglers | दारू तस्करांच्या युक्त्यांपुढे पोलीस यंत्रणा हतबल

दारू तस्करांच्या युक्त्यांपुढे पोलीस यंत्रणा हतबल

Next

चंद्रपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात अवैध दारूचे अक्षरश: पाट वाहत आहेत. जिल्ह्यात येणारी दारू रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी पोलिसांचे हे प्रयत्न उधळून लावून तस्कर नाना युक्त्या करीत जिल्ह्यात दारूचा पुरवठा करीतच आहेत. दामदुपटीने विकल्या जाणाऱ्या या दारूमुळे सामान्य मद्यपी आर्थिकदृष्टया उद्ध्वस्त होत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातून दारू हद्दपार करण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीचा पाठपुरावा करीत दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. त्यातून १ एप्रिलला दारूबंदी झाली खरी, पण आता दारूबंदी हा केवळ फार्स वाटावा इतकी बिकट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. केवळ मुखबिराकडून मिळालेल्या माहितीवरच पोलिसांच्या कारवाया सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुखबिरांपासून सावध राहत दारू तस्कर छुप्या मार्गाने दारूची तस्करी करीत आहेत.

गॅस सिलिंडर आणि महागडी वाहने
दारू तस्करीसाठी जे जे युक्त्या करता येतील, त्या तस्करांकडून केल्या जात आहे. दारूबंदीनंतर पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य मार्गावर पोलीस चौक्या उभारल्या होत्या. या दरम्यान, गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महाभागाला घुग्घूस पोलिसांनी अटक केली होती. त्याही पुढे जाऊन आता पोलिसांना संशय येऊ नये म्हणून जिल्ह्यात दारू आणण्यासाठी महागड्या वाहनांचा वापर केला जात आहे. सामान्यपणे महागड्या वाहनातून दारूची तस्करी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पोलिसांकडून अशा वाहनांची तपासणी केली जात नाही. मात्र जेव्हा चंद्रपूर शहरातील चोरखिडकी परिसरात काही महागड्या वाहनात देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या तेव्हा पोलिसांनी डोक्यावर हातच मारून घेतले.

तस्करीसाठी वेशांतर
कमी वेळात अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेकजण अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत. मध्यंतरी चंद्रपूर शहर पोलिसांनी एका विधिज्ञाला अवैध दारू विकताना रंगेहात पकडले होते. त्यामुळे या धंद्यात प्रतिष्ठितांनीही उडी घेतल्याची बाब उजेडात आली. रविवारी तर घुग्घूसमध्ये एक धक्कादायक प्रकार उजेडात आला. घुग्घूस येथील रहिवासी रमेश पोचम चिरुगुला या २६ वर्षीय युवकाने दारूची तस्करी करण्यासाठी चक्क वेशांतर केले. अन्य दारू विक्रेत्या महिलांसोबत त्यानेही महिलेचा वेश परिधान केला. मात्र त्याची ही युक्ती कामी आली नाही. घुग्घूसच्या बसस्थानकावर पोलिसांनी त्याच्यासह अन्य तीन महिलांना अटक केली.

१०० दिवसांत पावणेदोन कोटींची दारू जप्त
दारूबंदीनंतर पोलिसांनी अवैध दारू विरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्यात. केवळ १०० दिवसांत एक कोटी ८५ लाख ४० हजार ४०७ रुपयांची दारू जप्त केली, तर अवैधरित्या दारूची तस्करी, विक्री करणाऱ्या दोन हजार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. अवैध दारू विक्री आणि तस्करी प्रकरणी एक हजार ८०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Police machinery in front of liquor smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.