दारु तस्करी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
By admin | Published: April 8, 2015 12:05 AM2015-04-08T00:05:47+5:302015-04-08T00:05:47+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने लगतच्या आंध्र प्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. ...
पोलीस विभाग सज्ज : गावागावांत सुरू आहे जनजागृती
जिवती: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने लगतच्या आंध्र प्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जीवती पोलीस सतर्क झाले आहेत. यासोबतच गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे.
वर्धा, गडचिरोली व आता चंद्रपूर जिल्ह्यात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दारुबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला. १ एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. पहाडावरील जीवती तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असल्याने तेथून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी जीवती, भारी, टेकामांडवा, वणी, ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असून महत्त्वाच्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतर काही मद्यपींच्या जवळच असलेल्या केरामेरी, मेडीगुडा, इंदाबी या तेलंगणा राज्यातील गावात चकरा सुरू झाल्या आहेत. दारूबंदी होताच, या गावांतील रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. या गावांतूनही जिवती तालुक्यात दारूची आयात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दारुबंदीनंतर सावरलेले कुटुंब पुन्हा उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी जिवती पोलिसांनी तेलंगणातून दारूसाठा पोहोचविण्यापूर्वीच दारूवर नियंत्रण ठेवण्यासाठी योजना आखली आहे. त्याचबरोबरच गावागावांत चालणारी मोहफुलाची दारू कायमची बंद राहावी, यासाठी जीवतीचे निरीक्षक ठाणेदार नरेंद्र वानखेडे यांनी गावागावांत जावून जागृती संदेश देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन ते गावकऱ्यांना करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
सीमेवरील गावांत अवैध दारू विक्री
तेलंगणा राज्याची सीमा येथून अगदी जवळ आहे. केरोमेरी, मेढीगुडा, इंदाणी आदी ठिकाणी तेलंगणाची दारु मोठ्या प्रमाणात विक्री होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यापेक्षा आंध्र प्रदेशातील दारुच्या किंमतीही कमी आहेत. त्यामुळे जवळपासच्या नागरिकांनी या गावांमध्ये आपली वर्दळ वाढविली आहे. काहींनी तेलंगणातून दारु आणून परिसरातील गावात दारु विकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.