सीमेवर उभारलेली पोलीस चौकी गायब !
By admin | Published: April 29, 2016 01:11 AM2016-04-29T01:11:33+5:302016-04-29T01:11:33+5:30
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करुन एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु दारु विक्रेते व तस्करांना आळा घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांना यश आले नाही.
दारु तस्करांना रस्ता मोकळा : तेलंगणातील दारु परवानाधारक मालामाल
राजुरा : शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करुन एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु दारु विक्रेते व तस्करांना आळा घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांना यश आले नाही. अवैधरित्या दारू विकली जात असून दारु व्यवसाय जोमात सुरू आहे. सीमेवरील पोलीस चौकीही गायब झाल्यामुळे तेलंगणा राज्यातील सीमेवरील परवानाधारकांना याचा मोठा प्रमाणात फायदा होत आहे. तेलगंणाची दारु व महाराष्ट्राचा पैसा असा खेळ राजुरा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती तालुक्यात सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची घोषणा झाली. निर्णयही झाला. तरीही दारुबंदी जिल्ह्यात दारुचा महापूर वाहत आहे. दारुबंदीपूर्वीॅ परवानाधारक मालामाल झाले होते. त्यामुळे त्यांनी दारुबंदी हटविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात यशस्वी झाले नाही. परवानाधारक ३००- ४०० दुकानदार दारु विक्री करीत होते. दारुबंदीनंतर अवैध दारु विक्री करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या संख्येत असून अल्पशा कालावधीत मोठी रक्कम मिळ्ण्याचे साधन बनले आहे. ४० रुपयांची देशी दारुची बॉटल १२० ते १५० रुपयात विक्री सुरू आहे. तेलंगणातील ६० रुपयाची बॉटल १५० रुपयात व विदेशी दारुची ११० रुपयाची बॉटल २५० रुपयात विक्री करून कमाई केली जात आहे. पोलीससुध्दा चिरमिरी घेऊन बाजुला होत आहे. त्यामुळे दारु विक्रीचा धंदा सर्वत्र जोमात सुरू आहे. त्यांना कोणाचीही भीती नाही. दारु पिणाऱ्याची संख्या वाढली आहे. परंतु दारु पिण्याचा डोज कमी झाल्यामुळे झगडे तंटेचे प्रमाण कमी झाले आहे.
तेलंगणातील वाकडी, बेला, आसिफाबाद, काजगनगर, सिरपूर, मंचेरीयल, बेलमपल्ली येथील परवानाधारक दुकानदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिंपरी, बल्लारपूर तालुक्यात दारुची आयात करुन सर्रास विक्री सुरू आहे. जंगल शेजारी व आड मार्गावर पोलिसांची गस्ती नसते. त्यामुळे विक्रेत्यांचे फावत असून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेची रक्कम व तेलंगणाची दारु असा प्रकार सर्रास सुरू आहे. तेलंगणातील परवानाधारक दुकानामधील दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज लाखो रुपयाची दारु सीमेजवळील तालुक्यात बिनधास्त येत आहे व त्याची विक्री चौकात किंवा घरपोच सेवा सुरू आहे. यावर आळा घालणे पोलिसांना सहज शक्य आहे. परंतु त्यांचीही मानसिकता आता बदलल्याचे दिसून येत आहे.
सीमेवरील पोलीस चौकी गायब झाली आहे. पोलिसांचा तंबू निघाला आहे. त्यामुळे तस्करांना राज्य मार्गाने बिनधास्त दारुची आयात करता येत आहे. यात सहजपणे दररोज हजारोची कमाई होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक गुंतले आहेत. (तालुका प्रतिनिधी)