बल्लारपुरात पोलिसांची गस्त सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:46+5:302021-03-28T04:26:46+5:30
बल्लारपूर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. असे असले तरी पोलिसांची ...
बल्लारपूर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. असे असले तरी पोलिसांची गस्त कमी झाली नसल्याचे चित्र सध्या बल्लारपुरात बघायला मिळत आहे.
सार्वजनिक शौचालयाकडे दुर्लक्ष
गोंडपिपरी : शहर स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी नगर पंचायततर्फे शहरात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले. मात्र याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दुर्गंधी पसरली आहे. अनेकदा नगरसेवकांना सांगूनही स्वच्छता करण्यात आली नाही.
वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास
सिंदेवाही : सध्या वन्यप्राणी जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये शिरकाव करीत आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. बिबट गावात येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवितात. या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
शौचालयायाअभावी नागरिकांची गैरसोय
कोरपना : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात शौचालयाची व्यवस्थाच नाही. कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. शासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेरोजगारांना हवा आर्थिक आधार
वरोरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही महिन्यापूर्वी सामाजिक संस्थेचे बेरोजगार मेळावा आयोजित करून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान, खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
सावली : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकामध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बाखर्डी : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
अल्प उत्पादनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
नागभीड : परिसरात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्यावर अनेक संकट कोसळले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना राबवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला
घुग्घुस : पडोली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
भद्रावती : काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे. बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
लांब अंतरावरील बसफेऱ्यांची मागणी
जिवती : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती येथून लाबं पल्ल्याच्या बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे. जिवती येथून यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, नांदेड, लातूर, केरीमेरी, आदिलाबाद मार्गे कोरपना अशा बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे.