सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:09+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने हा विषय गांभिर्याने घेत तीन ठिकाणी धाडी घालून सुंगधित तंबाखूचा अवैध साठा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘लोकमत’ शुक्रवारी ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून ‘चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत’ या आशयाच्या वृत्तातून सुगंधित तंबाखूच्या छुप्या मार्गाने होत असलेल्या विक्रीचा भंडाफोड केला. या वृत्ताने अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलीस प्रशासनही खळबडून जागे झाले. स्थानिक गुन्हे शाखेने दिवसभरात सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाडसत्र राबवून चंद्रपूर शहर, पडोली, पोंभूणा व गडचांदूर येथून तब्बल २० लाख ४०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठाच जप्त केला. या साठेबाजांवर यापुढे अन्न व औषध विभाग कारवाई करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली.
सुगंधित तंबाखूचा काळाबाजार होऊ नये, याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. या विभागात कर्तव्यावर असणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अशा काळाबाजारावर कार्यवाही करण्याचे अधिकार आहे.
परतुं, चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने हा विषय गांभिर्याने घेत तीन ठिकाणी धाडी घालून सुंगधित तंबाखूचा अवैध साठा जप्त केला. यामध्ये पडोली येथे आरीफ हारूण कोलसावाला (४२) रा. अरविंदनगर मूल रोड चंद्रपूर याच्या मालकीचा तब्बल १५ लाख ३७ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेचे जप्त केला. याशिवाय भिवापूर वार्डातील सुपर मार्केट येथे नरेंद्र राघोबाजी दुपारे (५२) रा. भिवापूर वार्ड याच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा तर पोंभूर्णा येथील सचिन नानाजी लेकलवार यांच्याकडून ३३ हजार रुपयांचा सुंगधित तंबाखू जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक गदाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोयर, पोेलीस हवालदार बुजाडे व काकडे यांनी केली.
गडचांदूरात ४ लाखांचा तंबाखू जप्त
गडचांदूर पोलिसांनी सावित्रीबाई फुले शाळेजवळील चौकात एमएच ३४ एए ४७८४ या क्रमांकाच्या कारमधूर ४ लाखांचा सुगंधित तंबाखू तप्त केला. यामध्ये इज्तियाज किडिया रा. गडचांदूर याच्यासह दोघांना अटक केली आहे. पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.
मोठ्या साठेबाजांना अभय
सुगंधित तंबाखूचा अवैध व्यापार करणारे बडी मंडळींपर्यंत अद्यापही पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे हात पोहचलेले नाही. ते पोहचणारही नाही, अशी चर्चा या कारवायानंतर सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणखी सुगंधित तंबाखूचे मोठे साठे असून याची माहितीही संबंधित विभागाला आहे. मात्र त्यांच्यावर हात टाकणार नाही, अशीही चर्चा ऐकायला आली आहे.
वरोºयातील ‘त्या’ कारवाईची साठेबाजाला पूर्वकल्पना पोलिसाकडूनच?
वरोरा येथे काही दिवसांपूर्वी सुंगधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. सदर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक येणार असल्याची पूर्वसूचना एका पोलिसानेच संबंधित तंबाखू साठेबाजाला दिली होती. यानंतर तंबाखूचा साठा इतरत्र हलविल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. याची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली.