युगसाठी पोलिसांनी पालथा घातला परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:04 PM2018-08-25T23:04:36+5:302018-08-25T23:05:02+5:30
बुधवारपासून घरासमोरील चौकातून खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला आहे. चवथ्या दिवशीपर्यंत शोध न लागल्याने पोलिसांनी कामाची गती वाढवून अख्खा परिसर पालथा घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : बुधवारपासून घरासमोरील चौकातून खंडाळा येथील युग अशोक मेश्राम हा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला आहे. चवथ्या दिवशीपर्यंत शोध न लागल्याने पोलिसांनी कामाची गती वाढवून अख्खा परिसर पालथा घातला आहे.
यापूर्वी २०१४ मध्ये ख्रिस्तानंद स्कूलमधून दुसऱ्या वर्गात शिकणारी शिवानी गजबे हिचे अपहरण झाले होते, परंतु २४ तासात मुलीसह आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले होते. लहान मुलीच्या अपहरणाने संपूर्ण ब्रह्मपुरी काही काळासाठी अशांत झाला होता. २२ आॅगस्टला युग नावाचा दोन वर्षीय बालक बेपत्ता झाला. चार दिवस लोटूनही त्याचा सुगावा न लागल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून परिसरातील तलाव, विहिरी, बोडी, सुनसान स्थळे पिंजून काढली आहेत तरीही या प्रकरणाचा छडा न लागल्याने पोलिसात ही चिंतनाचा विषय बनला आहे.
अधिकाºयांसह शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत खंडाळ्याचा परिसर पिंजून काढणे सुरू आहे तरीही शोध न लागल्याने तर्कवितर्क अनेक काढले जात आहे. परिसरात या घटनेने लक्ष वेधले असले तरी पोलिसांसाठी हा विषय आव्हानात्मक ठरला आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.