विष प्यायलेल्या तरुणीला घेऊन पोलीस दुचाकीने पोहचले रुग्णालयात; वाचवला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 08:45 PM2022-05-09T20:45:26+5:302022-05-09T20:45:54+5:30

Chandrapur News विष प्राशन केलेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचल्याची घटना चंद्रपूर शहरात घडली.

Police rushed to the hospital on a two-wheeler carrying the poisoned girl; Saved life | विष प्यायलेल्या तरुणीला घेऊन पोलीस दुचाकीने पोहचले रुग्णालयात; वाचवला जीव

विष प्यायलेल्या तरुणीला घेऊन पोलीस दुचाकीने पोहचले रुग्णालयात; वाचवला जीव

Next
ठळक मुद्दे११२ हेल्पलाईनवर मिळालेल्या माहितीने तरुणीचा जीव वाचला

चंद्रपूर : सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ११२ वर फोन खणखणला. म. फुले नगीनाबाग चौकातील एका तरुणीने विष प्राशन केल्याची माहिती कळवली. नियंत्रण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी लगेच रामनगर ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या टॅबवर याबाबत संदेश पोहचविला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या दुचाकीनेच घटनास्थळ गाठले. तरुणी गंभीर अवस्थेत पडून दिसली. तिला दवाखान्यात नेण्यासाठी कोणतेच वाहन नव्हते. वेळही नव्हता. अखेर पोलिसांनी कोणत्याही वाहनाची प्रतीक्षा न करता अस्वस्थ तरुणीला दुचाकीवर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. फिल्मी कथानकासारखा हा प्रकार घडला असला तरी यामुळे त्या तरुणीवर वेळीच उपचार झाले अन् तिचे प्राण वाचले.

अंमलदार परवेश पठाण व मंगेश सायंकार असे ‘त्या’ तरुणीसाठी देवदूत ठरलेल्या पोलिसांचे नाव आहे. म. फुले नगीनाबाग येथील २१ वर्षीय तरुणीने क्षुल्लक कारणातून ऑल आऊट लिक्विड प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मदत व पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी सुरु केलेल्या ११२ या क्रमांकावर याबाबतची माहिती देण्यात आली.

११२ च्या मुंबई प्राथमिक केंद्रात कॉल गेल्यानंतर चंद्रपूर केंद्राशी जोडणी करण्यात आली. यावेळी आत्महत्येबाबत संदेश मिळताच रामनगर येथील चार्ली ड्युटीवर हजर असलेले पोलीस अंमलदार परवेश पठाण व मंगेश सायंकार यांना मोबाईल टॅबवर कळविण्यात आले. त्यांनी लगेच त्या मुलीचे घर गाठले. मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कोणतेही वाहन उपलब्ध नसताना पीडित मुलीला तत्काळ आपल्या दुचाकी वाहनावर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांच्या चमूने वेळीच योग्य तो उपचार केल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्या मुलीचे प्राण वाचले. त्यामुळे त्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

११२ सदैव नागरिकांच्या सेवेत

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत घेता यावी, यासाठी पोलीस विभागाने ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे. गुरुवारी याच हेल्पलाईनवर आलेल्या कॉलमुळे ‘त्या’ २१ वर्षीय तरुणीचे प्राण वाचले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन नोडल अधिकारी राजेश डोकेवाड यांनी केले आहे.

Web Title: Police rushed to the hospital on a two-wheeler carrying the poisoned girl; Saved life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस