पोलीसपुत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:15 AM2019-08-29T00:15:37+5:302019-08-29T00:16:58+5:30
मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशसेवेसाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्यसरकारचे आणि गृहमंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस पुत्रांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चाची सुरुवात हनुमान मंदिर बेलेवाडी येथून करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जिल्हाधिकारी यांना पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले.
मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. हे पोलीस कर्मचाºयांसाठी घातक असून, राज्यातील पोलीस कर्मचारी विविध समस्यांचा सामना करीत आहे. मात्र, शिस्तीच्या नावाखाली पोलीस कर्मचाºयांना मोर्चे, आंदोलन करता येत नसल्याने त्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या मुलांनी एकत्र येण्याचे ठरवून पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा निर्धार केला. मंगळवारी मोर्चाद्वारे पोलीस कर्मचाºयांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी विधानपरिषदेत पोलीस बॉइज असोसिएशनचा एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावा, होमगार्डसना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी, पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात यावी, पोलीस कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोलीस भरतीत पोलीस बॉइजना दहा टक्के आरक्षण द्यावे आदी मागण्यांचे निवेदन पोलीस बॉइज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शाहिद सैय्यद, भुवनेश्वर निमगडे, देविदास गिरडे, तोजीतचंद्र पिपरे, अमित वाघमारे आदी उपस्थित होते.