मनपा क्षेत्रातील ३६ हजार बालकांना पाजणार पोलिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:13 PM2018-02-26T23:13:12+5:302018-02-26T23:13:12+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओे लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी ११ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओे लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी ११ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. या दुसऱ्या फेरीत मनपा हद्दीतील ३६ हजार १८९ बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच चंद्रपूर मनपा सिटी टास्क फोर्सची सभा मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली. या सभेत उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शितल वाकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. नयना उत्तरवार, कार्यक्रम व्यस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, तसेच शहरातील सामाजिक स्वयंसेवी संस्थातर्फे पियुष माहेश्वरी, अनुप गांधी, रोटरी क्लब आॅफ चंद्रपूरचे अजय जैस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत चांदेकर, नरेश नासरे, रेड क्रॉस सोसायटीचे सुभाष मुरस्कर, जिल्हा एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे शोभा वनाखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक आर. व्ही. खांडरे जिल्हा माहिती अधिकारी, वन अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बसस्थानक, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणी सुद्धा ३० ट्रांझिट टिमद्वारा लसीकरणाची व्यवस्था केली आहे. तसेच आयपीपीआय मोहिमेमध्ये घरोघरी जाऊन लस पाजण्याकरिता १८४ चमूची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाच बुथ, टिम करीता एक पर्यवेक्षक असे पल्स पोलिओच्या दिवशी २७ पर्यवेक्षक व घर भेटीसाठी ३६ पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस अवश्य पाजून घ्यावी, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे यांनी केले.
चंद्रपुरात १३० लसीकरण केंद्र
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ३६ हजार १८९ बालकांना पोलीओ लस पाजण्यात येणार असून यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी, दवाखाने, इत्यादी ठिकाणी १३० तात्पुरती लसीकरण केंद्र (बुथ) स्थापन करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त प्रवासात असलेल्या व स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरिता १८ मोबाईल टिमची व्यवस्था केलेली आहे.