राजकीय नेत्यांचे फलक, बॅनर हटवा!
By Admin | Published: January 13, 2017 12:29 AM2017-01-13T00:29:41+5:302017-01-13T00:29:41+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा होताच प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची वाहने काढा
चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा होताच प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि पंचायत समितीचे सभापती आदी पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याचे आदेश दिले. तसेच जिल्ह्याभरात लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फ्लेक्स काढण्याचे निर्देशही यावेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या संदर्भात सूचना देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सलील यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपूर्ण निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, आचारसंहिता लागू झाली असल्याने सरकारी वाहने काढण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर आणि विषय समित्यांचे सर्व सभापती यांना शासकीय वाहने देण्यात आली होती. बुधवारी आचारसंहिता लागू होताच त्यांनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने जमा केली आहेत. त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने जमा करून आपल्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागणार आहे. सलील यांनी निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत सजग राहण्याचे निर्देश दिले.
ग्रामीण भागात मंत्री, राजकीय नेते, कार्यकर्ते आदींच्या वाढदिवसांचे आणि अभिनंदन करणारे फलक लागलेले आहेत. ते सर्व राजकीय फलक काढण्याबाबतही सलील यांनी निर्देश दिले. राजकीय नेत्यांचे फलक काढून निवडणूक निष्पक्ष होण्यासाठी मदत करावीढ़ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, निवडणूक उपजिल्हाधिकारी चिखले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१५ पथकांचे गठन करणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता १५ तालुक्यात तालुकास्तरावर निवडणूक पथकांचे गठन केले जाणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, त्याची छाननी करणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करणे, चिन्ह वाटप करणे आदी सर्व प्रक्रिया तालुका पातळीवर पार पाडली जाणार आहे. त्याकरिता निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांच्या नेतृत्त्वात कार्यवाही केली जाणार आहे. तहसीलदारांचे पथक सर्व निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहे.