विधवा महिलेकडून राजकीय पुढाऱ्यांनी मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 05:00 AM2022-06-12T05:00:00+5:302022-06-12T05:00:19+5:30

जामखुर्द येथील एका विधवा महिलेने आर्थिक विवंचनेत आपला ट्रॅक्टर विकला. मात्र, ट्रॅक्टर घेणारा व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे ही महिला त्रस्त होती. तिच्या असहायतेचा  फायदा घेत विकलेल्या ट्रॅक्टरचे तीन लाख रुपये वसूल करून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. 

Political leaders demand ransom from widow | विधवा महिलेकडून राजकीय पुढाऱ्यांनी मागितली खंडणी

विधवा महिलेकडून राजकीय पुढाऱ्यांनी मागितली खंडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : ट्रॅक्टर विक्रीचे अडकलेले पैसे काढून देण्यासाठी एका विधवा महिलेकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन राजकीय पुढाऱ्यांना शुक्रवारी अटक करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  
दोघांनाही अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
जामखुर्द येथील एका विधवा महिलेने आर्थिक विवंचनेत आपला ट्रॅक्टर विकला. मात्र, ट्रॅक्टर घेणारा व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे ही महिला त्रस्त होती. तिच्या असहायतेचा  फायदा घेत विकलेल्या ट्रॅक्टरचे तीन लाख रुपये वसूल करून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. 
सुरूवातीला फिर्यादीने आरोपींना २० हजार रुपये दिले. उर्वरित ३० हजार रुपयांच्या मागणीसाठी आरोपींनी फिर्यादीकडे तगादा लावला. शिवाय तिला ‘तू विधवा आहेस, तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याने त्रस्त झालेल्या फिर्यादी महिलेने १० जून रोजी पोंभूर्णा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३८४, ३८५, ५०६, ३४ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. 
या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या सूचनेनुसार ठाणेदार धर्मेंद्र जोशी करत आहेत.

एका आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल
- ऑल इंडिया पँथर सेनेचा जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार याच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 
- या गुन्ह्यांमुळे त्याची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. 
- पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता, त्याला तडीपार करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: Political leaders demand ransom from widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.