हे घ्या पुरावे..! सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवारांकडून पत्रकबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 11:32 AM2022-04-06T11:32:56+5:302022-04-06T11:36:27+5:30
एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे.
चंद्रपूर : येथील पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आवश्यक बाबींसाठी राज्य शासनाने मंजूर केलेला ५० लाखांचा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाला, असा दावा माजी अर्थमंत्री आमदारसुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. कोणाचा दावा किती खरा, ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
याप्रकरणी आमदार मुनगंटीवार यांनी केलेला पाठपुरावा व निधी मंजूर झाल्याचे पत्र पाठवून हे घ्या पुरावे म्हणत बाॅम्बच टाकला आहे. दुसरीकडे आमदार जोरगेवार यांनी नागपूर दीक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केल्याचा दावा केला. इतकेच नव्हे, तर अधिवेशनात सातत्याने मागणी लावून धरल्यामुळेच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाल्याचा दावा केला होता. यातील ५० लाख दीक्षाभूमीच्या विकासासाठी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आमदार जोरगेवार यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा. सोबतच संविधान भवन आणि आदिवासी समाजासाठी आदिवासी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्याचे प्रसिद्धीपत्रकही काढले होते. एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे.
आमदार मुनगंटीवार यांनी आपला दावा खरा आहे, हे सांगण्यासाठी केलेला पत्रव्यवहार आणि त्यावर ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या नावाने प्राप्त पत्रच पुरावा म्हणून वृत्तपत्रांकडे पाठविला आहे. तर, आमदार जोरगेवार यांनी मुंडे यांना पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविली आहे. मात्र, त्यांच्या पत्राच्या आधारे निधी मंजूर झाल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून येत नाही.