राजकारण्यांना लागले आरक्षणाचे डोहाळे
By admin | Published: September 27, 2016 12:50 AM2016-09-27T00:50:24+5:302016-09-27T00:50:24+5:30
मूल नगरपालिकेच्या नगरसेवक व नगराध्यक्षाची निवडणूक १६ डिसेंबरला होत आहे. प्रभागातील नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
नगरसेवकांचे आरक्षण झाले : आता नगराध्यक्षाची प्रतीक्षा
भोजराज गोवर्धन मूल
मूल नगरपालिकेच्या नगरसेवक व नगराध्यक्षाची निवडणूक १६ डिसेंबरला होत आहे. प्रभागातील नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण अजूननही घोषित झालेले नाही. यंदा नगराध्यक्षपदासाठी उभे राहणाऱ्या उमेदवाराला थेट जनतेशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच राजकारण्यांना आरक्षणाचे डोहाळे लागले आहेत.
जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतसे निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. निवडणुकीची तारीख जाहिर झाली आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले. आतापर्यंत प्रभागातील अर्धेअधिक कार्यकर्ते ‘उमेदवारी मलाच मिळेल’, या आशेवर कामालाही लागले. मूल नगरपालिकेत भाजपाचे वर्चस्व आहे. मात्र यंदा भाजपाच्या अनेक नगरसेवकांवर मूलवासी नाराज आहे. त्यामुळे फायदा काँग्रेस, राकाँला होवू शकतो. नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले नशिब आजमाविण्याचा प्रयत्न चालविला आहे. ते आतापासूनच नवीन चेहरे शोधताना दिसून येत आहेत.
केंद्र व राज्यात, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. काम करताना भाजपाला विशेष अडचण येत नाही. त्यामुळे यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक नवीन चेहरे समोर येत आहेत. त्यामुळे उमेदवारी द्यायची कोणाला, हाही प्रश्न भाजपा नेत्यांसमोर आहे.
पक्षात तन-मन-धनाने काम करणाऱ्या खंद्या कार्यकर्त्यांनाही नाराज करू शकत नाही आणि मोजकीच उमेदवारी द्यायची असल्यामुळे कोणाची निवड करावी, हा विचार करणे आवश्यक आहे. १७ सदस्यीय मूल नगरपालिकेची निवडणूक ८ डिसेंबर २०११ रोजी पार पडली होती. त्यावेळी भाजपाचे ९, काँग्रेस ३, राकाँ २ आणि अपक्ष ३ असे सदस्यीय बलाबल होते. मात्र १६ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मूल नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला, किती नगरसेवक निवडून आणता येतील, हे येणारा काळच सांगेल. असे असतानाही जोपर्यंत मूल नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत खऱ्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.
सुधीर मुनगंटीवारांच्या कामाची चर्चा
नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृहक्षेत्रातील मूल शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे. दोन वर्षांत मूल शहराचा चेहरामोहरा बदलला, हे सर्वसामान्यानाही दिसून येते. त्यामुळेच ना. मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर मूलची जनता समाधानी आहे. त्यामुळे भाजपाला यंदाची निवडणूक जास्त जड जाईल, असे वाटत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.