चंद्रपुरात पुतळे उभारणीवरून राजकारणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:06+5:302021-03-04T04:52:06+5:30
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्याची कारवाई मनपा प्रशासनाने ...
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्याची कारवाई मनपा प्रशासनाने केली असे महापौर सांगतात. आयुक्त म्हणतात की, ही कारवाई प्रशासन, मनपा आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. पोलीस आणि तहसीलदार ही कारवाई मनपाने केल्याचे सांगत आहे. प्रत्येक विभाग या कारवाईबाबत आपली जबाबदारी झटकत आहे. मग ही कारवाई नेमकी कुणी केली, असा गंभीर सवाल रामू तिवारी यांनी उपस्थित करून मनपाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आदिवासी संघटनांतर्फे लोकवर्गणीतून बीएसएनएल कार्यालयाजवळील रेल्वे स्थानकासमोर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यात आला. अतिक्रमणाचे कारण पुढे करून २७ फेब्रुवारीला पोलीस बंदोबस्त व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुतळा हटविण्यात आला. त्यामुळे आदिवासी समाजात रोष निर्माण झाला आहे. हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकू लागले. सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आदिवासी समाजाला दिलासा देण्याची विनंती निवेदनातून केली. पुतळा हटविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतरही मनपा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले जाऊ लागले. या प्रकाराने मनपा प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. आदिवासी समाजाची मागणी प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा रामू तिवारी यांनी दिला आहे.
डॉ.कलाम, वाजपेयी यांचे पुतळे उभारणीवर प्रश्न
बाबूपेठ येथील क्रीडासंकुलात अटलबिहारी वाजपेयी यांचा, तर बायपास मार्गावरील उद्यानात डॉ.कलाम यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. यांच्याबाबतीत काँग्रेस पक्षात नेहमीच आदर आहे. मात्र, हे पुतळे उभारताना शासनाने नियम पाळले वा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. आदिवासी समाजाने उभारलेला पुतळा हटविण्यात आला. डॉ.कलाम, वाजपेयी यांचे पुतळे उभारणीमागे महापालिका प्रशासनाने भूमिका जाहीर करावी, असे अशीही मागणी रामू तिवारी यांनी केली आहे.