विदर्भाबाबत खोट्या गोष्टींवर राजकारण
By admin | Published: January 24, 2017 12:44 AM2017-01-24T00:44:49+5:302017-01-24T00:44:49+5:30
वेगळ्या विदर्भाची मागणी १८८० पासून करण्यात येत असून त्यावेळी आणि आताही हिंदी व मराठी असा वाद नसल्याचा दावा करीत ...
भद्रावतीत व्याख्यानमाला : श्रीहरी अणे यांचा आरोप
भद्रावती : वेगळ्या विदर्भाची मागणी १८८० पासून करण्यात येत असून त्यावेळी आणि आताही हिंदी व मराठी असा वाद नसल्याचा दावा करीत विदर्भ विरोधकांकडून खोट्या गोष्टींवर राजकारण केले जात आहे, असा आरोप विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी केला.
अॅड. अणे स्थानिक लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव पाटील गुंडावार यांच्या जयंती समारोहानिमित्य आयोजित व्याख्यानमालेत ‘वेगळा विदर्भ, काळाची गरज’, या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार होते. प्रमुख अतिथी वेगळ्या विदर्भाचे समर्थक कमलेश भगतकर, सुरेंद्र पारधी, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव मधुकर जारळे, सदस्य विश्वनाथ पत्तीवार, प्राचार्य जी.एन. ठेंगणे आदी उपस्थित होते.
अॅड. अणे पुढे म्हणाले, महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी विदर्भ अस्तित्वात होता. १९४७ पूर्वी आपल्यासाठी कलकत्ता विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ होते. माझ्या वडिलांची पदवी दिल्ली विद्यापीठाची होती. मराठी भाषकांचे एक राज्य का असू नये, असा विचार त्यावेळी पुढे आला. त्यातून विदर्भ महाराष्ट्राचा एक भाग बनला. त्यावेळी मराठ्यांची व्याप्ती ६० टक्के प्रदेशावर होती. तो शिवकालीन महाराष्ट्र होता, आजचा नव्हे. मराठी माणूस देशात अनेक ठिकाणी गेला. तेथे मराठी माणसाचे राज्य का निर्माण झाले नाही ? महाराष्ट्रातच मराठी माणसाचे एक राज्य असले पाहिजे, असा आग्रह का धरला जातो, असा प्रश्नही अॅड. अणे यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
अध्यक्षीय भाषणात बळवंतराव गुंडावार म्हणाले की, विदर्भ काळाची गरज आहे. विदर्भ महाराष्ट्रात सामिल होऊ नये, अशी भूमिका त्या काळात काही नेत्यांनी घेतली होती. त्यापैकी मा.सा. कन्नमवार हे एक होते. विदर्भात फक्त १६ साखर कारखाने आहेत. त्यापैकी चार सुरू आहेत. इतर प्रांतात मात्र जास्त आहेत. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांच्या पूर्वीपासून विदर्भ राज्याची मागणी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अॅड. श्रीहरी अणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अॅड. अणे यांचा बळवंतराव गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर बळवंतराव गुंडावार यांचा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच या विद्यालयातील शिक्षक आर.एस. मामीडवार यांनी आतापावेतो २० वेळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. विलास कोटगिरवार यांनी २६ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचाही अॅड. अणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय आतिश मेश्राम या खेळाडूचाही सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक उपप्राचार्य ए.एस. पामाट्टीवार यांनी केले. संचालन एस.डी. उपलंचीवार यांनी केले व आभार मिनाक्षी वासाडे यांनी मानले. प्राजक्ता चिखलीकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
विदर्भाच्या वाट्याला केवळ २.५ टक्के नोकऱ्या
विदर्भाची जमीन महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या एक तृतीयांश आहे. महाराष्ट्रात शासकीय नोकऱ्या देताना ५० टक्के नोकऱ्या पुणे विभागात दिल्या जातात. विदर्भाच्या वाट्याला केवळ २.५ टक्के नोकऱ्या येतात. गेल्या ६० वर्षांपासून विदर्भाला २२ टक्क्यांपेक्षा अधिक एकही पैसा मिळाला नाही. चांगल्या नोकऱ्या १० टक्क्यांपेक्षा जास्त मिळाल्या नाहीत. विदर्भातील माणूस चपराशाचाही लायकीचा नाही, असे त्यांनी ठरवून टाकल्याचाही आरोप अॅड. अणे यांनी केला. विदर्भवाद्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे दुमत नाही, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.