सरपंचपदासाठी फोडाफोडीचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:33 AM2021-02-05T07:33:10+5:302021-02-05T07:33:10+5:30
राजकुमार चुनारकर चिमूर : आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काठावरील बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. ...
राजकुमार चुनारकर
चिमूर : आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काठावरील बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.
आरक्षणामुळे बहुमत असूनदेखील सरपंचपदाचा उमेदवार नसलेल्या आघाडीच्या नेत्यांनी विरोधी आघाडीतील उमेदवार फोडण्यासाठी वाटेल ती 'किंमत' मोजण्याची तयारी ठेवली असल्याचे समजते.
तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
नुकतेच आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर आता सरपंच - उपसरपंच पदाची निवडणूकही जाहीर झाली. येत्या १० फेब्रुवारीपासून ही निवड टप्प्याटप्प्याने होत आहे. ज्यांच्या निवडी स्पष्ट आहेत, त्या गावांमध्ये आतापासूनच सरपंच - उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक झळकू लागले आहेत. परंतु काही गावांमध्ये ‘कांटे की टक्कर’ आहे. काही गावांमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत नाही; तर काही गावांमध्ये बहुमत एका आघाडीला मिळाले आहे. परंतु त्यांच्याकडे सरपंचपदाचा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या गावातील निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
टोकाचा संघर्ष व प्रचंड इर्ष्या असलेल्या आणि निसटते बहुमत मिळालेल्या गावातील नेत्यांनी सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. धोका नको म्हणून सदस्यांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक आघाडीचे नेते सदस्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बहुमत मिळालेल्या आघाडीकडे सरपंचपदाचा उमेदवार नसल्याने विरोधी आघाडीच्या उमेदवारालाच आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अशा गावातील विरोधी आघाडीने आपल्या सरपंचपदाच्या उमेदवाराला अज्ञातस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.