मनपा निवडणुकीत शांततेत मतदान

By admin | Published: April 20, 2017 01:26 AM2017-04-20T01:26:36+5:302017-04-20T01:26:36+5:30

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी

Polling in peaceful elections in the elections | मनपा निवडणुकीत शांततेत मतदान

मनपा निवडणुकीत शांततेत मतदान

Next

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली. मात्र उन्हाच्या तडाक्याने मतदानावर चांगलाच परिणाम झाला. मतदान केंद्रावर सकाळपासून असलेली मतदारांची संख्या सायंकाळपर्यंत तशीच कायम राहिली. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सरासरी ५८ टक्के मतदानाची नोंद झाली.
मनपा निवडणुकीत ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात आहेत. ८ एप्रिलला सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिल्यानंतर ९ एप्रिलपासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. नऊ दिवसांच्या प्रचारानंतर आज बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानासाठी शहरात ठिकठिकाणी ३६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील २६ केंद्र संवेदनशिल असल्याने त्याकडे भरारी पथक विशेष लक्ष ठेवून होते. या निवडणुकीकरिता एकूण ४४० कंट्रोल युनिट व १२५८ बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रशासनाकडून १० टक्के मतदान पथके राखीव ठेवण्यात आले होते तर मतदान केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आज सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या चंद्रपुरात सुर्य आग ओकत आहे. त्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान मोठ्या प्रमाणात होईल, अशी प्रशासनाला व सर्वानाच अपेक्षा होती. मात्र सकाळपासूनच मतदारांमध्ये उदासीनता दिसून आली. शहरातील प्रत्येक केंद्रावर दोन-चार मतदार येऊन मतदान करून जात होते. सकाळी १०, ११ वाजेपर्यंत अशीच स्थिती कायम होती.

नागरकरांच्या कार्यकर्त्यांना
पोलिसांकडून मारहाण
महाकाली प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार नंदू नागरकर यांच्या घरासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप नंदू नागरकर यांनी केला. हे कार्यकर्ते रात्री १२.३० वाजताच्या सुमारास नागरकर यांच्या घरासमोर वाहन पार्क करीत असताना पोलिसांनी लाठीने मारहाण केली, असा त्यांचा आरोप आहे. मात्र असा कुठलाच प्रकार घडला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अनिल महाराजांना ताब्यात घेतले
जटपुरा प्रभागातील भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी अनिल महाराज हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार प्रविण पडवेकर यांनी केला. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत शहर पोलिसांनी अनिल महाराज यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळ चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

बॅनर निघाले; मात्र झेंडे करीत होते प्रचार
आदर्श आचार संहिता व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार १७ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता थांबविण्यात आला. प्रचारावर पायबंद असताना शहरात कोणत्याही उमेदवारांचे वा राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, झेंडे लावण्यात येऊ नये असेही निर्देश आहे. मनपा प्रशासनाने शहरातील चौकाचौकातील व रस्त्यावरी बॅनर, फ्लेक्स काढून टाकले. मात्र काही ठिकाणी राजकीय पक्षांचे झेंडे आज मतदानाच्या दिवशीही फडकत होते. चांदा पब्लिक स्कुलपासून काही अंतरावर एका रस्त्यावरील झाडावर काँग्रेसचा झेंडा फडकत होता तर जनता कॉलेजच्या मागे गरबा ग्राऊंडवर भाजपाचे तीन झेंडे फडकताना दिसून आले.

 

Web Title: Polling in peaceful elections in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.