कोळसा खाणीत प्रदूषण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:27 PM2019-02-06T21:27:15+5:302019-02-06T21:28:22+5:30
राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या खुल्या कोळसा खाणीत प्रदूषणाने कहरच केला आहे. धूळ प्रदूषणामुळे वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने हे प्रदूषण जीवघेणे ठरत आहे.
वेकोलिच्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी २, गोवरी डीप खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणीत नियमांना डावलून धूळप्रदूषण केले जाते. दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खाणीत धूळ उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलि प्रशासन वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविते. परंतु कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वेकोलि घेत नाही. हे कामगारांचे दुदैव आहे. कामगारांच्या सुरक्षिततेचा वेकोलित मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जातो. परंतु हा कामगाराप्रति वेकोलि प्रशासनाने दाखविलेला केवळ देखावा आहे. वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील रस्ते धुळीने माखले आहे. एखादा ट्रक जवळून गेला तर रस्त्यावरील समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता असते. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वेकोलि प्रशासनाची आहे. परंतु वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलि प्रशासन कामगारांच्या जिवाशी खेळ करीत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेकोलित उडणारी धूळ का दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेकोलितून उडणाºया धुळीने कोळसा खाण परिसरातील शेती पूर्णत: काळवंडली आहे. कोळशाच्या उडणाºया धुळीने अनेकांचे नुकसान होत असताना धूळ प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. केवळ जबाबदारी झटकून चालणार नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आपले चोख कर्तव्य बजावावे लागणार आहे.
वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी धूळ प्रदूषणावर लक्ष दिले नाही तर नागरिकांचा अधिकाऱ्यांविरुद्ध उद्रेक होईल, हे निश्चित आहे. वेकोलितून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने परिसरातील नागरिकही बेजार झाले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का ?
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र धूळ प्रदूषणावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सुटत चालल्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणात नियमाची एैसीतैसी केली जात आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे.