चंद्रपुरात धावणार प्रदूषणमुक्त वातानुकूलित 'ई-बस'!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 04:32 PM2024-07-01T16:32:34+5:302024-07-01T16:33:04+5:30
Chandrapur : आयुक्त विपीन पालिवाल यांच्या कल्पक दृष्टिकोनातून तयार झालेल्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वतः दिली मान्यता
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सूतोवाच केलेल्या 'पीएम ई-बस सेवे'चा प्रस्ताव अखेर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावानुसार, ५० वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. आयुक्त विपीन पालिवाल यांच्या कल्पक दृष्टिकोनातून तयार झालेल्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरकरांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची भर पडली. वातावरणातील जीवघेण्या घटकांमुळे विविध आजारांची तीव्रता वाढल्याचे शासनाचे अहवाल सांगतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रकल्पाच्या स्वरूपाबाबत आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये 'पीएम ई-बस सेवा' या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना दोन श्रेणींमध्ये लागू केली जाईल. पहिल्या श्रेणीमध्ये शहर बससेवा व संबंधित पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या श्रेणीत 'ग्रीन अर्बन मोबिलिटी इनिशिएटिव्ह'चा समावेश आहे. महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडे दोन टप्प्यांत ५० ई- बसेसचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास चंद्रपूरच्या विकासातील आमूलाग्र बदलाचा हाही एक महत्त्वपूर्ण ठरेल !
चार्जिंगसाठी किती वेळ लागेल?
'ई-बस' बसस्थानक कुठे?
'ई-बस'साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाईल. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना ५० ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात २० ई-बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. पण इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, डेपो व अन्य व्यवस्थापनाचा खर्च चंद्रपूर मनपाला पेलणार काय, हाही प्रश्नच आहे.
ई-बस म्हणजे काय ?
ई-बस ही एक शून्य उत्सर्जन बस आहे. ती साधारणतः कोणताही आवाज करत नाही. ते इंधनाऐवजी विजेवर चालते. अशा बसेस ऑनबोर्ड बॅटरी पॅक किंवा बाह्य स्रोताकडून ऊर्जा प्राप्त करतात. चीन व अनेक युरोपीय देशांमध्ये या बसेस आधीपासूनच वापरात आहेत. राजधानी दिल्लीत हा प्रयोग सुरु आहे.
जलद चार्जरवर ई-बस एक ते दीड तासात चार्ज करता येते. ते एका चार्जमध्ये किमान १२० किमी धावू शकते. त्यासाठी डेपो चार्जिंग स्टेशन सुसज्ज ठेवाव्या लागतात. अन्यथा अडचणी येतात. डीटीसी फ्लीटमधील ई-बस शून्य टेलपाइप उत्सर्जनासह ते इंधनावर आधारित वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करते. अशा ई-बसेस प्रदूषणावर मात करण्यास प्रभावी ठरतात.
ई-बसमध्ये काय विशेष आहे?
ई-बसेसच्या किमतीनुसार त्यात विविध सुविधा असतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक बसमध्ये १० पॅनिक बटणे आणि एक टूटर असतो. शिवाय, दिव्यांग प्रवाशांसाठी गुडघे टेकण्याचा स्म्प व महिला प्रवाशांसाठी खास आसनांची व्यवस्था असते.
'ई-बस' कुठून कुठपर्यंत ?
चंद्रपूर शहर व लगतच्या २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
या बसेस चंद्रपुरातून बामणी, बल्लारपूर, भदावती, घुग्गुस. आरवट-चारवट तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतील
केंद्रीय संस्थांकडून मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडा आणि नवीन चंद्रपूर बसस्थानक, चार्जिंग स्टेशन व इतर सेवा केंद्र सरकारच्या निधीतून नागरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमाने उभारल्या जातील.
महापालिकेने केंद्र सरकारला ई-बस'चा प्रस्ताव सादर केला. कृषी भवन परिसरात पीएम ई-बस सेवेसाठी पायाभूत संरचना उभारण्याची प्रशासनाची योजना आहे. सीएमसी'ला शहर बससेवा संचालनाचे कंत्राट दिले जाईल, अशी शक्यता आहे. बस चालवण्यासाठी सरकार प्रति किमी २५ रुपये अनुदान देईल. मुख्य बसस्थानक व पीएम ई-बस स्थानक एकमेकांशी जोडले जाईल. साधारणतः वर्षभरात ही सेवा सुरू होईल, यादृष्टीने प्रयल केले जात आहेत.
- विपीन पालिवाल, आयुक्त, महापालिका, चंद्रपूर.