प्रदूषणाने शहरातील नागरिक झाले बेजार
By admin | Published: October 21, 2014 10:48 PM2014-10-21T22:48:33+5:302014-10-21T22:48:33+5:30
विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
चंद्रपूर: विविध उद्योगांकडून केले जाणारे प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रातील धुरांड्यातून ओकला जाणारा विषारी धूर, तसेच रस्त्यांवरील धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. धूळ प्रदूषणाने सामान्य नागरिक सध्या प्रचंड बेजार झाले आहेत. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.
देशात व राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी दोन वेळा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र कृती आराखडा कागदावरच जिरला. या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योगांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संबंधित शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या प्रामुख्याने चंद्रपूर महानगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचाही समावेश आहे. शहरातील प्रदूषणात रस्त्यावरील धुळीने भर घातली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते व बाहेरील रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्यात येत नसल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ही धूळ रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे शहरात धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
त्यातच शहरातील रस्त्यांवर वारंवार खोदकाम केले जात असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात आहे. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात आणखी वाढ होत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणारे सामान्य नागरिक, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना धूळ प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील धुळीचे नियंत्रण करण्याची मागणी करण्यात येत असली तरी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.(नगर प्रतिनिधी)