लॉयड मेटल्सच्या प्रदूषणाने पांढरे सोने काळवंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:37 AM2017-11-16T00:37:54+5:302017-11-16T00:38:29+5:30
तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकºयांचा कापूस काळवंडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकºयांचा कापूस काळवंडत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
लॉयड मेटल्स हा कच्चे लोखंड तयार करण्याचा कारखाना आहे. सदर कारखान्यामधील प्रदूषणाने उसेगाव व लगतच्या परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणारा कापूस झाडावरच काळा होत आहे. त्यामुळे या कापसाला व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. प्रदूषणामुळे या भागातील उत्पादनही निम्यावर आलेले आहे. सुपिक जमीन नापीक झालेली आहे. यामुळे परिसरातील शेती हळूहळू उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे पदाधिकारी महेश मेंढे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील चोखारे यांच्याकडे याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या कारखान्यामुळे परिसरातील २०० ते ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. कापूस तोडताना महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदन देताना शिष्टमंडळात परमानंद जोगी, रोशन रामटेके, माजी सभापती रोशन पचारे, मंगेश आसूटकर, रमेश काळे, पवन आगदारी, केशव काळे, मनोहर धाबेकर, नथ्थू देरकर, रमेश बुच्चे, प्रशांत सारोकर, स्वागत बुरचुंडे, जावेद कुरेशी, बबलू सातपुते व परिसरातील शेतकऱ्यांचा समावेश होता.