बहुरूपी’ ही भटकी जमात विकासाच्या मार्गावर
By admin | Published: July 23, 2016 01:48 AM2016-07-23T01:48:23+5:302016-07-23T01:48:23+5:30
नागभीड तालुक्यातील चिंधीमाल या लहान गावात १० ते २० घराची बहुरूपी समाजाची वस्ती आहे.
‘चिंधीमाल : परंपरागत व्यवसायाकडे पाठ
चिंधीचक : नागभीड तालुक्यातील चिंधीमाल या लहान गावात १० ते २० घराची बहुरूपी समाजाची वस्ती आहे. बहुरूपी समाज हा भटका असून त्यांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे विविध सोंगे घेऊन लोकांचे मनोरंजन करणे व त्यांचेकडून दक्षिणा घेणे होय. गावामध्ये भराडी, गोसावी, बहुरूपी, गोरखनाथ, अल्लक निरंजन, पांगुळ, दरवेशी, मदारी, पंचाळ, मसनजोगी, नंदीवाले आदी लोक गावामध्ये येत असतात. त्यामधील बहुरूपी गावामध्ये हमखास येत असतात. चिंधीमालच्या बहुरूपी समाजाने विकासाचा मार्ग पत्करला आहे.
बहुरूपी विविध सोंगे काढीत असतात. ते कधीे शेटजी, कधी भटजी, कधी वनिया, केव्हा पोलिसांचे रूप घेत असतात. त्यांचे रोंग एवढे हुबेहुब असते की, क्षणभर आपण बुचकाळ्यात पडतो. वाटते, खरोखर पोलीस आले असावेत. त्या मनोरंजनाच्या आधारे मिळणाऱ्या दक्षिणेवर ते उदरनिर्वाह करीत असतात. पण आता वेळ बदलली व काळही बदलला आहे. आता घरात इलेक्ट्रानिक मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या जीवंत मनोरंजनाला गौण स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहरूपी लोक परंपरागत व्यवसाय सोडून इतर व्यवसायाकडे वळू लागले आहे.
आजमितीस चिंधीमाल येथील सर्व कुटुंबे कोणत्या-कोणत्या व्यवसायामध्ये व्यस्त झाली आहेत. अनेक कुटुंब कापड व्यवसायामध्ये, प्लॉस्टिक भांडे, नेवार तर काही म्हैस, ठेले आणि काही लोक सोडून ओरिसा राज्यात लोखंडी पलंगाच्या व्यवसाय करीत आहेत. घरोघरी जाऊन दक्षिणा मागण्यापेक्षा स्वाभिमानाने व्यवसाय करणे अधिक पसंत करीत आहेत. त्यामुळे त्यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्यांच्या राहणीमानातसुद्धा आमूलाग्र बदल झाला आहे. (वार्ताहर)