तलावाची दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:19+5:302021-02-16T04:29:19+5:30
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा चंद्रपूर : स्थानिक नगिनाबाग वॉर्डात कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला असून, ...
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : स्थानिक नगिनाबाग वॉर्डात कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला असून, याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या मोकाट कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी हल्ले करून मुलांना जखमी केले. या घटना वाढत असून, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कृषिपंपांना वीजजोडणीची प्रतीक्षा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक कृषिपंपासाठी वीजजोडणी न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत. जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.
माजरी-कोंढा मार्गावर धुळीचे साम्राज्य
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होते. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करीत असल्याने, या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचून राहतो. त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
चिल्लरच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : सध्या देवाण-घेवाणीतील व्यवहारात चिल्लरचा तुटवडा असल्याने व्यावसायिकासह ग्राहक हैराण झाले आहे. किराणा दुकान, भाजीपाला, पान टपऱ्यांमध्ये नागरिकांना चिल्लरसाठी संताप व्यक्त होताना दिसत आहे. व्यवहाराच्या दृष्टीने चिल्लर पैशाचे नाणे व नोटांची गरज अत्यावश्यक आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातही चिल्लरचा तुटवडा निर्माण होताना दिसून येत आहे.
दुर्गापुरात अपघाताची शक्यता वाढली
दुर्गापूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बांधावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर मार्ग ओलांडून जाताना वळण घेत ये-जा करावे लागते. यात अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक होत आहे. अनेक छोटे-मोठे अपघातही या रस्त्यावर झाले आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होत असल्याने, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
सिंचनाची व्यवस्था करण्याची मागणी
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत, सोबतच उद्योगधंदे नसल्याने बहुतांश जनता शेतीवरच आपला संसार चालवित आहे. त्यामुळे तालुक्यात त्वरित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
वाचनालयात बेरोजगारांची गर्दी
चंद्रपूर: लाॅकडाऊनपासून बंद असलेले वाचनालये सुरू झाले आहे. त्यामुळे वाचनालयामध्ये गर्दी बघायला मिळत आहे.
सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे वेध लागले असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांचा कल आहे. मात्र, शासकीय नोकरभरतीच होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य पसरले आहे.