झिलबोडी परिसरात शेतपांदन रस्त्यांची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:49+5:302021-07-10T04:19:49+5:30
ब्रह्मपुरी : पावसामुळे झिलबोडी परिसरातील अनेक गावातील शेतशिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्याची दैनावस्था झाली आहे. शेतात जायचे कसे, असा प्रश्न ...
ब्रह्मपुरी : पावसामुळे झिलबोडी परिसरातील अनेक गावातील शेतशिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्याची दैनावस्था झाली आहे. शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी गावातील शेतपांदन रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहेत. ऐन हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी बी - बियाणे, खते शेतातील झोपडीत नेवून ठेवतात. मात्र, शेतीच्या हंगामापासून शेतकऱ्यांचा माल घरात येईपर्यंत याच चिखलमय पांदन रस्त्यांवरून शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते. मात्र, ग्रामीण भागात योजनांची पायमल्ली होत आहे. अनेक वर्षांपासून पांदन रस्त्यांची स्थिती जैसे थे आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे.
कोट
पावसाने पांदन रस्ता खराब झाला आहे. मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतातील कामासाठी मजूर, खत व बैलबंडी नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पांदन रस्त्याचे तातडीने खडीकरण करण्याची गरज आहे.
- दिनेश गाडगे, शेतकरी तथा सदस्य ग्रामपंचायत, झिलबोडी.