गरीब विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शाळेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:38 PM2018-01-22T23:38:30+5:302018-01-22T23:39:02+5:30
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे तालुक्यातील आर्थिक, सामाजिक, दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे तालुक्यातील आर्थिक, सामाजिक, दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी २४ जानेवारीपासून अर्ज सादर करता येणार असून १४ व १५ फेब्रुवारीला सोडत काढली जाणार आहे.
ब्रह्मपुरी तालुका शैक्षणिक क्षेत्रात प्रगत असला तरी अजूनही बरेचसे पालक आपल्या पाल्यांना इच्छा असूनही दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे बरेचसे हुशार पाल्य गरिबीमुळे कसेबसे शिक्षण घेवून तेथेच थांबत असतात. शिक्षणाची ही विषमता समानतेमध्ये बदलावी यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे गरिबांच्या पाल्यांना इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या विनाअनुदानीत, स्वयंअर्थसहय्यीत शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे.
२५ टक्के आरक्षित जागेवर आर्थिक, सामाजिक दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत यांच्या पाल्यांना तसेच अनाथ व दिव्यांग बालकांना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार असून यासाठी एक लाखाच्या कमी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे.
आधार कार्ड, पासपोर्ट, वीज बिल, निवडणूक ओळखपत्र, घरटॅक्स पावती, पाणीपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, उत्पन्नाचा दाखला, पालकाचा जातीचा दाखला आदी कागदपत्रासहित २४ जानेवारी व ८ ते १२ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्याची सोडत १४ ते १५ फेब्रुवारी रोजी काढली जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.