चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येचा आलेख वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:07+5:302021-07-11T04:20:07+5:30
लोकसंख्या दिन विशेष वसंत खेडेकर बल्लारपूर : औद्योगिक अशी सर्वदूर ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे एकूण ...
लोकसंख्या दिन विशेष
वसंत खेडेकर
बल्लारपूर : औद्योगिक अशी सर्वदूर ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे एकूण लोकसंख्या २२ लाख ४ हजार ९०७ असून त्यात पुरुष ११ लाख २३ हजार ८३४ तर महिलांची संख्या १० लाख ८० हजार ४७३ आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येचे स्त्री-पुरुष प्रमाण ९३१ आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत लोकसंख्येत बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसते.
चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्र ११ हजार ४४३ चौरस किलोमीटर एवढे आहे. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाऊन लोकसंख्या जाहीर केली जाते. २०११ नंतर ती आता २०२१ ला होणे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १५ तालुके येतात. यात चंद्रपूर तालुक्याची लोकसंख्या सर्वाधिक चार लाख ८१ हजार ७५८ असून स्त्री पुरुष प्रमाण ९४६ आहे. मूल तालुक्यात स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक ९९८ आहे. ग्रामीण आणि विशेषतः धान पीक घेणाऱ्या भागात स्त्री-पुरुष प्रमाण अधिक आहे.तर शहरी व औद्योगिक पट्ट्यामध्ये त्यामानाने ते कमी आहे. बल्लारपूर हे क्षेत्रफळाने जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका असून या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीची संख्या फक्त १७ आहे. बाकी सर्व तालुक्यातील तर संख्या ३०चे वर आहे. चिमूर तालुक्यात तर ९८ ग्रामपंचायती येतात. बल्लारपूर तालुक्याचे क्षेत्रफळ तसेच तेथील ग्रामपंचायतीची संख्या बघता या तालुक्याची १ लाख ३४ हजार ५४० ही लोकसंख्या लक्षवेधी म्हणता येईल. बल्लारपूर शहराची लोकसंख्या ८९ हजार ४५२ आहे.२००१ ला ती ८९ हजार जिल्ह्यातील इतर तालुक्यांची लोकसंख्या अशी--भद्रावती -१ लाख ५८ हजार ७५१,ब्रम्हपुरी-१ लाख ६६ हजार, चिमूर-१लाख ६९ हजार ५४७,गोंडपिंपरी-७९ हजार ६७२, जिवती-६१ हजार ८२०,कोरपना-१ लाख २५ हजार ३१७, मूल-१ लाख १४ हजार ६११,नागभीड-१ लाख ३३ हजार, पोंभूर्णा-५० हजार ७८१,राजुरा-१ लाख ३८ हजार ४०८,सिंदेवाही-१ लाख १० हजार ४४०,वरोरा-१ लाख ७१ हजार ५४०,सावली-१ लाख ७ हजार ९३७.
पुढील जनगणनेनंतर या लोकसंख्येत किती वाढ वा घट होणार हे कळेल. काही ठिकाणी घटही होऊ शकते. बल्लारपूर शहराची २००१ ला ८९ हजार ९९५ एवढी लोकसंख्या होती. घटून २०११ ला ती ८९ हजार ४५२ झाली आहे, हे येथे उल्लेखनीय!