पोंभुर्णा विकासाग्रणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:45 AM2018-10-22T00:45:11+5:302018-10-22T00:45:58+5:30
आष्टा या गावातील विविध विकासकामांसाठी २५१५ या लेखाशिषाअंतर्गत ५० लाख रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा करीत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच पंचायत समित्यांमध्ये पोंभुर्णा तालुका आणि पंचायत समिती विकासाग्रणी ठरावी यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आष्टा या गावातील विविध विकासकामांसाठी २५१५ या लेखाशिषाअंतर्गत ५० लाख रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा करीत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच पंचायत समित्यांमध्ये पोंभुर्णा तालुका आणि पंचायत समिती विकासाग्रणी ठरावी यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथे जि. प. कृषी विभागातर्फे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, आष्टाचे सरपंच हरीश ढवस, पंचायत समिती सदस्या ज्योती बुरांडे, कृषी अधिकारी उदय पाटील, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे आदीं उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, आष्टा या गावाचा संकल्प करण्यासाठी हरीश ढवस यांच्यासह गावकऱ्यांनी जे प्रयत्न सुरू केले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. या गावानजिक घाटकुळ येथे ५० कोटींचे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी पोंभुर्णा तालुक्यात कार्यरत झाली असून लवकरच मोठा दुग्ध व्यवसाय प्रकल्प, अगरबत्ती प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प याठिकाणी कार्यान्वीत करणार आहोत. तसेच येथील एमआयडीसीला मान्यता मिळाली असून हा तालुका विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ५६ गावांमध्ये एलईडी लाईट, प्रत्येक गावात जलशुध्दीकरण संयंत्र, प्रत्येक गाव शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना बियाणे व डस्टबीन वितरण करण्यात आले.
उमेदच्या माध्यमातून मालवाहू गाड्यांचे वितरण
पोंभुर्णा पंचायत समितीमध्ये उमेदच्या माध्यमातून मालवाहू गाड्यांचे वितरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आज उपलब्ध झालेली एक गाडी उद्या दहा गाड्यांमध्ये रूपांतरीत व्हाव्या व लाभार्थ्यांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.