ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय
By admin | Published: May 1, 2017 12:43 AM2017-05-01T00:43:09+5:302017-05-01T00:43:09+5:30
ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यापासून सर्वसामान्यांच्या गावपातळीवरील दैनंदिन व्यवहारामध्ये स्वत:ला झोकून देऊन...
सुधीर मुनगंटीवार : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा मेळावा
बल्लारपूर : ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यापासून सर्वसामान्यांच्या गावपातळीवरील दैनंदिन व्यवहारामध्ये स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे दिले.
चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या विदर्भस्तरीय मेळाव्याला ते संबोधीत करत होते. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द देत असल्याचे त्यांनी सांगितले. ना. मुनगंटीवार यांनी सत्तेबाहेर असतानासुध्दा ग्रामपंचायत कर्मचा-यांसाठी आपण लढा दिल्याची आठवण सांगितली. विधिमंडळात विविध आयुध वापरुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाचा प्रश्न सोडविला. त्यामुळे तुमच्या खात्याचा मंत्री नसलो तरी तुमच्या विषयाचा मी मंत्री आहे. या मागण्यांसदर्भातील लढा मी सुरु केला होता. त्यामुळे तुमची मागणी मान्य करण्यासाठी मंत्रालयात ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगाही काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
बल्लारपूर येथे विदभार्तील ठिकठिकाणावरुन आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्याची मांडणी संघटनेचे अध्यक्ष विलास कुमरवार व सरचिटणीस गिरीष दाभाळकर यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद कर्मचा-यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी, निवृत्ती वेतन मिळावे अशा दोन प्रमुख मागण्या आहेत. या मेळाव्याला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीष शर्मा, पं.स. सभापती गोविंद पोडे, जि.प. सदस्य हरीश गेडाम, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अतिथी पोहोचले उशिरा
कार्यक्रम दुपारी १ वाजताचा होता. पण, अतिथी सायंकाळ ६ वाजता पोहचले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत होते. त्या येतील व त्या प्रत्यक्ष मागण्याचे निवेदन स्विकारतील व त्यावर त्या बोलतील, अशी उपस्थितांना अपेक्षा होती. त्या न आल्याने कर्मचारी नाराज झालेत. तसे पंकजा मुंडे या बल्लारपुरात येऊन येथील इतर कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. परंतु, मुंबईला जाणे गरजेचे असल्याने आणि विमानाची वेळ झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांच्या या मेळाव्याकडे पाठ फिरविली. दरम्यान, माझा शब्द व आश्वासन ते पंकजा मुंडे यांचे आश्वासन समजा, असे मुनगंटीवार म्हणाले.