सरपंच, उपसरपंच निवडीत पळवापळवी शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:27+5:302021-02-07T04:26:27+5:30
सिंदेवाही: तालुक्यात १२, १४ व १६ फेब्रुवारीला सरपंच,उपसरपंच पदासाठी निवड होणार आहे. सरपंच पदाचे उमेदवार बहुतेक ठिकाणी निश्चित आहे. ...
सिंदेवाही: तालुक्यात १२, १४ व १६ फेब्रुवारीला सरपंच,उपसरपंच पदासाठी निवड होणार आहे. सरपंच पदाचे उमेदवार बहुतेक ठिकाणी निश्चित आहे. मात्र उपसरपंच पदासाठी अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे घोडेबाजार तेजीत आणि पळवापळवी जोरात सुरू झाली आहे.
अनेक सदस्य सहलीवर गेले आहेत. त्यामुळे निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५५ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आहे. मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्याने काँग्रेससाठी निराशेचे वातावरण आहे. नवरगावसारखी मोठी ग्रामपंचायत काँग्रेस आपल्या ताब्यात ठेवण्यास उत्सुक आहे. काही ठिकाणी आरक्षणाचा गोंधळ वाढल्याने अनेकांचे स्वप्न भंगले झाले आहे. गावपुढारी आपल्याच पक्षाचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवावा यासाठी प्रयत्नशील असून सदस्यांना सहलीला नेले असल्याची माहिती आहे.
६ फेब्रुवारीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार सिंदेवाही येथे आले असता अनेक इच्छुकांनी त्यांची भेट घेऊन सरपंच, उपसरपंच पद मिळावे म्हणून विनवणी केली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच बसावे, यासाठी काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. भाजप आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठेवून त्यांच्यावर नजर ठेवून आहे.