भिसीत इंग्रजकालीन इमारतीतूनच चालतो डाकघराचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:18+5:302021-09-02T04:59:18+5:30
भिसी : भिसी हे अप्पर तालुक्याचे ठिकाण असून वीस हजार लोकसंख्येचे शहर आहे. तसेच मोठी व्यापारीपेठ आहे. येथे महाविद्यालय, ...
भिसी : भिसी हे अप्पर तालुक्याचे ठिकाण असून वीस हजार लोकसंख्येचे शहर आहे. तसेच मोठी व्यापारीपेठ आहे. येथे महाविद्यालय, दोन कनिष्ठ महाविद्यालय, तीन माध्यमिक शाळा, तीन बँका, एक पोलीस स्टेशन असे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाचे केंद्र असले तरी भिसीतील इंग्रजकालीन असलेल्या डाकघराची मागणी आजही अपूर्ण आहे.
भिसीत इंग्रजकालीन पोलीस स्टेशन होते. आज भव्य इमारत होऊन स्वतंत्र पोलीस स्टेशन म्हणून अस्तित्वात आहे. डाकघरसुद्धा इंग्रजकालीन असूनही स्वतंत्र नाही. आरडीच्या मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी व पोस्टाच्या मोठ्या कामासाठी चिमूरला जावे लागते. माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार विलास मुत्तेमवार चिमूरचे खासदार असताना भिसीत स्वतंत्र डाकघर होणार, अशी घोषणा केली होती. आजघडीला मुत्तेमवारांनंतर चार खासदार होऊन गेले, पण भिसीमध्ये स्वतंत्र डाकघर होऊ शकले नाही. डाकघराचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो.
कोट
भिसीमध्ये माझ्या डाकघरच्या पोस्टमन सेवेला आज ४४ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु आजही भिसीत स्वतंत्र डाकघर न झाल्याची खंत मनात आहे.
- श्रीहरी वानखेडे, ज्येष्ठ पोस्टमन, भिसी
बाॅक्स
खासदारांकडून अपेक्षा
चिमूरच्या डाकघराच्या अंतर्गत एकवीस सबडाकघर येतात. भिसी, शंकरपूर, साठगाव, नेरी, खडसंगी, जांभूळघाट, मोठेगाव व इतर पण भिसीला डाकघर नसल्याने भिसी परिसरातील पंचवीस-तीस खेड्यातील नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी चिमूरलाच जावे लागते. आर्थिक भुर्दंडाबरोबरच वेळही वाया जातो. गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी भिसीच्या स्वतंत्र डाकघराच्या समस्येकडे लक्ष देऊन डाकघराची निर्मिती करावी, अशी मागणी भिसी, पुयारदंड, गडपिपरी, महालगाव, जामगाव, चिचोली, येरखडा तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.