शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:41+5:302021-05-08T04:28:41+5:30
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे ५ वी आणि इ. ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी ...
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे ५ वी आणि इ. ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करूनही शासनाकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. उलट परीक्षा परिषदेने सुपरविजनचे नियोजन पत्र पाठवून संभ्रम वाढवला आहे. त्यामुळे त्वरित निर्णय घेऊन परीक्षा स्थगित करावी, अन्यथा परीक्षेवर बहिष्कार टाळण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला याविषयी निवेदन दिल्यानंतर परिषदेने हा विषय शासनाकडे टोलवला आहे. शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकललेल्या असताना तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा हट्ट का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र शासन तसेच शिक्षक संघटना,पालक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यभरात एकूण सहा लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
एका परीक्षा केंद्रावर २०० ते ५०० परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाइन परीक्षा कोविडच्या काळात घेणे, धोक्याचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने कोणत्याही परीक्षा या काळात घेऊ नये, असे निर्देश दिले आहे. असे असतानाही ५ मे २०२१ रोजी परीक्षा परिषदेने परीक्षा होणार असल्याचे नियोजन पत्र काढल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, २ मेपासून २८ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी देण्यात आली आहे. अनेक पालक व शिक्षक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तर काहींनी तसे नियोजन केले आहे. एकीकडे शिक्षकांना उन्हाळी सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.
शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अट्टाहास असाच चालू ठेवल्यास संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्याची इशारा विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालकांच्या वतीने आमदार नागो गणार, योगेश बन, अजय वानखेडे, सुनील पाटील, रंजना कावळे, जुगल बोरकर, अमोल देठे, विलास बोबडे, विजय साळवे आदींनी दिला आहे.